नवी दिल्ली – शरद पवारांच्या हस्ते नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शरद पवारांना खडेबोल सुनावले होते. यानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. मात्र आज (20 फेब्रुवारी) संजय राऊत आणि शरद पवार हे दोन्ही नेते दिल्लीत एका पुस्तक प्रकाशानाच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी संजय राऊत यांनी शरद पवारांचे कौतूक केले. ते आमचे विरोधक नाहीत आणि शत्रू तर अजिबाद नाहीत. शरद पवार हे आमचे मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार संजय राऊत यांनी काढले. तर शरद पवारांनी त्यांना त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.
संसद भवन ते सेंट्रल व्हिस्टा या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतील महाराष्ट्र सदनात झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते.
बाळासाहेब मला शरद बाबू म्हणायचे…
एखाद्याने मत मांडल म्हणून विसंवाद होण्याची प्रश्न नाही, असं शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे सभेत बोलत असताना त्यांच्याकडे जेवढे शब्द असतील ते सर्व आमच्यासाठी वापरत होते. मात्र सभा संपल्यानंतर ते घरी आले की सगळं विसरून जात होते. मला ते शरद बाबू म्हणायचे. या जुन्या आठवणींना शरद पवारांनी यावेळी उजाळा दिला.
शरद पवार आमचे महादजी शिंदे
आमचा नेता आमचा सेनापती, ते आमचे महादजी शिंदे आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी शरद पवारांचे कौतूक केले. ते म्हणाले की, “महाराष्ट्र सदन हे दिल्लीमध्ये मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं स्थान असलेली जागा आहे, आणि इथे हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला माननीय पवार साहेब उपस्थित आहेत. पवार साहेबांसोबत मी देखील आहे, माननीय पवार साहेब हे आमचे विरोधकही नाहीत आणि शत्रू तर अजिबात नाहीत. ते महाराष्ट्राचे, देशाचे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, आणि ते राहातील.”
हेही वाचा : Raut On Pawar : शरद पवारांचे शिंदेबद्दल ‘ते’ विधान अन् राऊत भडकले; म्हणाले, ‘हे खोटेय…’