घरदेश-विदेशपवार-मोदी भेटीत 'या' मुद्द्यांवर चर्चा; राष्ट्रवादीने दिलं स्पष्टीकरण

पवार-मोदी भेटीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा; राष्ट्रवादीने दिलं स्पष्टीकरण

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली, याबाबत खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी भेटीवरून विविध अफवा पसरवल्या जात आहेत, त्यात काहीही तथ्य नाही, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. तसंच, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या भेटीसंदर्भात देखील खुलासा केला आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी भेटीवरून विविध अफवा पसरवल्या जात आहेत, त्यात काहीही तथ्य नाही,” असं नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार-पंतप्रधान मोदींच्या भेटीवर नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण देताना शरद पवारांनी पंतप्रधान कार्यालयाची वेळ मागितली होती. वेळ मिळाल्यानंतर त्यांनी मोदींची भेट घेतली. सहकारी बँकांच्या कायद्यांमध्ये केंद्राने केलेल्या बदलाबाबत मोदी-पवार बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. या बैठकीत बँकेच्या नियमांसंदर्भात चर्चा झाली. रिझर्व्ह बँकेला खूप अधिकार देण्यात आले आहेत. नव्या नियमांमुळे सहकारी बँकांना मोठा फटका बसत आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

“सहकारी बँकेतून एखादा व्यक्ती कर्ज घेतो, त्यावेळी महाराष्ट्रातील कायद्यानुसार अडीच टक्के शेअर कॅपिटल त्यांना घ्यावा लागतो. पण कर्ज परत केल्यानंतर आपली शेअर कॅपिटलची रक्कम परत मिळावी अशी त्याची अपेक्षा असते. पण नव्या नियमांनुसार ती परत मिळू शकत नाही. या पद्धतीमुळे एखादा उद्योजक सर्व शेअर खरेदी करून बँकेवर कब्जा करू शकतो. नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा आली आहे. याविषयीचं निवेदन पवार यांनी पंतप्रधानांना दिलं. पंतप्रधान मोदींनी याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे, ” असं मलिक यांनी सांगितलं.

- Advertisement -

कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा

नवाब मलिक यांनी पुढे सांगतवा दोन नेत्यांमध्ये कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगितलं. “दोन्ही नेत्यांनी तसंच कोव्हिडच्या परिस्थितीवरही चर्चा केली. काल मोदींनी देशातील सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी चर्चा केली होती.” “मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनासंदर्भात धार्मिक ठिकाणे आणि गर्दीच्या कार्यक्रमांविषयी एक राष्ट्रीय धोरण बनवण्याची मागणी केली होती. कारण वेगळ्या राज्यांतील वेगळ्या नियमांमुळे अडचणी होत आहेत. याकडेही शरद पवारांनी लक्ष वेधलं. तसंच लसपुरवठा सुरळीतपणे करण्याची मागणीही पवार यांनी मोदींकडे केली आहे,” अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

पवार-फडणवीस भेटीच्या चर्चेत तथ्य नाही

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीत भेट झाल्याच्या चर्चा आहेत. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना ही भेट झाल्याचं फेटाळून लावलं आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट दिल्लीत झाली, या चर्चेत काहीही तथ्य नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -