Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश घोळात घोळ? दिल्लीतील बैठक

घोळात घोळ? दिल्लीतील बैठक

शरद पवारांनी बोलावलीच नव्हती, राष्ट्रमंचाच्या बैठकीत देशाला व्हिजन देण्याची चर्चा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठक तिसर्‍या आघाडीसाठी नव्हती. भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याचा आणि या बैठकीचा काहीच संबंध नव्हता. देशात अनेक मुद्दे आहेत; पण व्हिजन नाही. देशाला व्हिजन देण्यासाठी आजची बैठकही माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचच्या सदस्यांची होती. आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आम्ही देशाला व्हिजन देऊ, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अ‍ॅड. माजिद मेनन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची अडीच तास बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अ‍ॅड. माजिद मेमन, पवन वर्मा आणि समाजवादी पार्टीचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाला माहिती दिली. आजची बैठक ही मोदी किंवा भाजपविरोधातील नव्हती. पवारांच्या घरी बैठक झाली; पण पवारांनी बैठक बोलावली नव्हती. ही राष्ट्रमंचची बैठक होती. आम्ही त्याचे सदस्य म्हणून त्यात सहभागी झालो होतो, असे माजिद मेमन यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.

- Advertisement -

काँग्रेसला पण निमंत्रण होते
पवार तिसरी आघाडी करत असून काँग्रेसला एकटे पाडले जात आहे, अशी चर्चा आहे. तीही चुकीची आहे. या बैठकीला काँग्रेसच्या पाच खासदारांना आमंत्रण दिले होते. कपिल सिब्बल, शत्रुघ्न सिन्हा आणि अभिषेक मनू सिंघवी यांनाही बोलावण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेसने बहिष्कार टाकला किंवा काँग्रेसला एकटे पाडले या वृत्तात काही तथ्य नाही, असे सांगतानाच अ‍ॅड. मेनन म्हणाले की, देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावरही चर्चा झाली. ही राजकीय बैठक नव्हती.

अल्टरनेट व्हिजन तयार करणार
आजच्या बैठकीत अल्टरनेट व्हिजन तयार करण्यावर चर्चा झाली. यशवंत सिन्हा हे टीम स्थापन करून प्रत्येक मुद्यावर देशाला मजबूत व्हिजन देतील. तरुणांमध्ये व्हिजनचा अभाव असू नये यासाठी हा प्रयत्न असणार आहे. अर्थकारण, बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ आदींबाबत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील टीम देशाला व्हिजन देणार असल्याचे घनश्याम तिवारी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

पवारांनी पत्रकार परिषद टाळली?
पवारांच्या निवासस्थानी अडीच तास बैठक झाली. तोपर्यंत मीडियाचे प्रतिनिधी पवारांच्या घराबाहेर उभे होते. या बैठकीनंतर पवार मीडियासमोर येतील असे वाटत होते. मात्र, पवारांनी मीडियासमोर येणे टाळले. तर यशवंत सिन्हा यांनी पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक करून अधिक बोलण्यास नकार देऊन पत्रकार परिषदेतून अंग काढून घेतले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पवार मीडियाला सामोरे गेले असते तर त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब आणि प्रशांत किशोर यांच्यासोबत दोन वेळा झालेली बैठक आदी प्रश्न विचारले गेले असते. मात्र, त्यांनी मीडियासमोर येणे टाळले. या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठीच पवारांनी मीडियासमोर येणे टाळले का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -