काश्मीर फाईल्सची पुनरावृत्ती होतेय, काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादीने दि काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपट आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांना लक्ष्य करून प्रश्न उपस्थित केले आहेत.

काश्मीरमध्ये (Kashmir) पुन्हा एकदा अशांतता पसरली आहे. दहशतवाद्यांकडून सतत हल्ले होत असल्याने काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) पलायन करण्याच्या तयारीत आहेत. काश्मीर खोरे सोडून अनेक हिंदू पंडित (Hindu Pandit) जम्मूमध्ये स्थलांतरित होत असून १९९० पेक्षाही भयानक परिस्थिती असल्याचं या पंडितांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणावर राष्ट्रवादीने (National Congress Party) भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने दि काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपट आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांना लक्ष्य करून प्रश्न उपस्थित केले आहेत.

“काश्मीर खोऱ्यातून पुन्हा एकदा हिंदू बाहेर पडतोय. दि काश्मीर फाईल्सची (The Kashmir Files) पुनरावृत्ती होतेय. तेव्हाही भाजपच्या पाठिंब्याचे सरकार होते, आजही केंद्रात भाजपचे सरकार आहे. फरक एवढाच आहे की, अनुपम खेर तेव्हा कलम ३७० काढून टाका म्हणून ओरड करत होते”, असं ट्विट राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.

पुढे ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज कलम ३७० काढून टाकले आहे, तरीही काश्मीरमधील हिंदूची तीच अवस्था का? काश्मीर फाईल्सचे निर्माते, कलाकार आणि समर्थक आज शांत का? काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करा म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचा अमूल्य वेळ खर्च करणारे महाराष्ट्रातील भाजप नेते देखील शांत का? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीने भाजप आणि अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांची (Kashmiri Pandit) हत्या केली जात आहे. आतापर्यंत आठ जणांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून त्यांना ठार मारले आहे. यामध्ये अनेक सरकारी कर्मचारीही आहेत. त्यामुळे हिंदू कुटुंबियांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी काश्मीरमधून पलायन करायला सुरुवात केली आहे. अनेक खासगी वाहनांमधून सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीच जम्मूच्या दिशेने कूच केली.

गुरुवारी सकाळीच कुलगाममध्ये एका बँक मॅनेजरची हत्या करण्यात आली. या अशांत परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.