Homeदेश-विदेशNDA's strategy : प्रादेशिक पक्ष हिरावले अन् राष्ट्रीय पक्षात फोडाफोडी, लोकसभेची जय्यत...

NDA’s strategy : प्रादेशिक पक्ष हिरावले अन् राष्ट्रीय पक्षात फोडाफोडी, लोकसभेची जय्यत तयारी

Subscribe

मुंबई : राज्यात पावणेदोन वर्षांपासून टप्प्याटप्प्याने विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. या कालावधीत विरोधकांच्या महाविकास आघाडीतील दोन पक्ष दुभंगले तर, तिसऱ्या पक्षात फाटाफूट सुरू झाली आहे. एकूणच, या रणनीतीद्वारे लोकसभा निवडणुकांमध्ये ‘अब की बार 400 पार’ हा नारा वास्तवात उतरविण्याच्या दृष्टीने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची वाटचाल सुरू असल्याचे दिसते.

हेही वाचा – Ramesh Chennithala : चव्हाणांनी सांगायला हवं त्यांच्यावर कुठला दबाव आहे; चेन्नीथला यांचं आव्हान

या नव्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांतच काँग्रेसला नेतेफुटीचे तीन धक्के बसले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज, मंगळवारी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला. वस्तुत: त्यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा मागील जवळपास दीड वर्षांपासून सुरू होती, ती आज वास्तवात उतरली. आता त्यांना राज्यसभेत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. तसे संकेतही भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

याआधी शनिवारी (10 फेब्रुवारी 2024) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षात आपला केवळ वापरच केला गेला, पण आपले कोणीही ऐकले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यांच्याबरोबर मुलगा झिशान सिद्दीकी हे देखील काँग्रेसमधून बाहेर पडतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण त्यांनी आपण ‘काँग्रेसमध्येच राहणार’ असल्याचे स्पष्ट केले. तर, माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी देखील 14 जानेवारी रोजी काँग्रेसची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आजच्या आणि पूर्वीच्या काँग्रेसमध्ये खूप फरक असल्याची टीका त्यांनी केली होती.

हेही वाचा – Maharashtra politics : पाच दिवसांचा सिलसिला जारी… भाजपाच्या जाळ्यात दोन बडे नेते!

दुसरीकडे, शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य काही अस्वस्थ आमदारांनी जून 2022मध्ये बंडाचा झेंडा फडकावला. त्यांच्या या बंडामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी थेट पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर सुनावणी घेत, मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा मान्यही केला.

वर्षाच्या आतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील हेच नाट्य घडले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदार आणि खासदारांचा एक मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांनी शिंदे यांच्याप्रमाणेच पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर यावरही सुनावणी झाली आणि अलीकडेच पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना बहाल केले. विशेष म्हणजे, या सर्व राजकीय घडामोडींमध्ये भाजपाने महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपाच्या रणनितीमुळे दोन पक्ष त्यांच्या मूळ नेत्यांकडून हिरावले गेले तर, तिसऱ्या पक्षाला खिंडार पडायला लागले आहे, असे चित्र आहे.