नेपाळच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; पंतप्रधानांनी संरक्षण मंत्र्यांनाच हटवले

Nepal
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करत उपपंतप्रधान असलेले ईश्वर पोखरेल यांना संरक्षण मंत्रिपदावरून काढून टाकले आहे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांच्या नेपाळ भेटीच्या घोषणेनंतर काही तासांनीच ओली यांनी उपपंतप्रधान पोखरेल यांना संरक्षण मंत्रिपदावरून हटवले. आता स्वत: ओली संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणार असून ईश्वर पोखरेल सध्या तरी ओली मंत्रिमंडळातच राहणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि नेपाळमधील संबंधात कटुता आली आहे. नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांच्या सरकारने नकाशाचा वाद उफाळून काढत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कालांतराने नेपाळनं तो नकाशा शालेय अभ्यासक्रमातून हटवला. उत्तराखंडमधील कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरावर नेपाळने आपला दावा सांगितला होता. मे महिन्यात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लिपुलेख मार्गे कैलास मानसरोवर रोड लिंकचे उद्घाटन केले, तेव्हा नेपाळने तीव्र आक्षेप घेतला होता. यानंतर नेपाळनेही या तिन्ही क्षेत्रांचा नवीन नकाशा जाहीर केला होता. नवीन नकाशाला मान्यता देण्यासाठी घटनेत दुरुस्तीही करण्यात आली होती.

नेपाळच्या शिक्षण मंत्रालयाने माध्यमिक शिक्षणाच्या नवीन पुस्तकात हा नकाशा समाविष्ट केला होता. यात कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख हे नेपाळचा भाग असल्याचं दाखवण्यात आले. लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी भागात भारताने ५४२ चौरस किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केला आहे आणि हा नेपाळचा एक भाग आहे, असा या पुस्तकात दावा होता.

हेही वाचा –

भयानक! PUBG वर मैत्री झालेल्या मित्रांनीच तिच्यावर सामुहिक बलात्कार केला!