घरदेश-विदेशकाश्मीरमधील अतिरेक्यांपर्यंत शस्त्रास्त्र पोहोचविण्यासाठी उभारले नेटवर्क, एनआयएकडून खुलासा

काश्मीरमधील अतिरेक्यांपर्यंत शस्त्रास्त्र पोहोचविण्यासाठी उभारले नेटवर्क, एनआयएकडून खुलासा

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवाद्यांना दारुगोळा पोहोचविण्यासाठी स्थानिक स्तरावर एक नेटवर्क उभे केले होते. जम्मू भागातील या गटाचा म्होरक्या पाकिस्तानी हँडलर सज्जाद गुल होता. सीमेपलीकडून येणार्‍या ड्रोन (हेक्साकॉप्टर्स) द्वारे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा कधी आणि कुठे सोडायचे, हे तो ठरवत असे. यामध्ये यूबीजीएल राउंड (अंडर-बॅरल ग्रेनेड लाँचर्स) आणि चुंबकीय बॉम्बचाही समावेश आहे. एनआयएने गुरुवारी या प्रकरणातील सहा आरोपींविरुद्ध जम्मू येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

जर या नेटवर्कच्या हाती ड्रोन लागले असते तर, काश्मीर खोऱ्यातील सक्रिय अतिरेक्यांपर्यंत ही शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोहोचवली गेली असती. गेल्या वर्षी जम्मूच्या कठुआ भागात ड्रोन (हेक्साकॉप्टर्स) द्वारे यूबीजीएल राउंड आणि मॅग्नेटिक बॉम्बसह शस्त्रे पाठविण्यात आली होती. हे ड्रोन सीमेपलीकडून आले होते. मात्र, हा दारूगोळा दहशतवाद्यांच्या हाती जाण्यापूर्वीच तो पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण दहशतवाद्यांशी संबंधित असल्याने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.

- Advertisement -

एनआयएने 30 जुलै रोजी पुन्हा गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला. भादंवि कलम 120B, 121A, 122, यूएपीएचे कलम 16, 17, 18, 18B, 20, 23, 38, 39 आणि 40 आणि आर्म्स अॅक्टच्या कलम 25(1)(a) आणि 25(1AA) स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम 4 आणि 5 अंतर्गत सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पाकिस्तानी हँडलर सज्जाद गुलच्या सूचनेनुसार या आरोपींच्या माध्यमातून जम्मू भागात ही घातक सामग्री पोहोचवली जात असे. तेथून ते काश्मीर खोऱ्यातील अतिरेक्यांपर्यंत पोहोचवण्यात येते. यासाठी आरोपी सज्जाद लोन याने एक नेटवर्क तयार केले होते. ड्रोनमधून शस्त्रे केव्हा आणि कुठे सोडली जातील, ती कोण रिसिव्ह करेल आणि त्यानंतर ती लक्ष्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कोण पार पाडेल, हे गुल ठरवत होता, असे एनआयएच्या चौकशीत समोर आले आहे.

- Advertisement -

भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या कटाअंतर्गत एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केला. ड्रोनद्वारे टाकण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये चुंबकीय बॉम्बचाही समावेश होता. गेल्या वर्षी अमरनाथ यात्रा सुरू झाली तेव्हा सुरक्षा दलांनी अशा बॉम्बबाबत सावधगिरीचा इशाराही दिला होता. कोणत्याही वाहनाच्या खाली किंवा बाजूला असे बॉम्ब चिकटवणे हा दहशतवाद्यांचा किंवा त्यांच्या हस्तकांचा उद्देश होता. काही वेळाने तो बॉम्ब फुटत असे.

एनआयएच्या आरोपपत्रात फैजल मुनीर, हबीब, मियां सोहेल, मुनी मोहम्मद (मृत), राशिद, सज्जाद गुल ऊर्फ ​​शेख सज्जाद ऊर्फ ​​शेख सज्जाद गुल ऊर्फ ​​सज्जाद अहमद शेख ऊर्फ ​​हमजा ऊर्फ ​​अल्बर्ट ऊर्फ ​​रेमंड ग्रीन ऊर्फ ​​डोनाल्ड ग्रीन ऊर्फ ​​भाईजान यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -