मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दळभद्री राजकारणाचे नवेच प्रकरण समोर आणले आहे. 18 ते 22 या दरम्यान संसदेचे जे विशेष अधिवेशन बोलावले त्या काळात संसदेच्या कर्मचाऱ्यांचा रुबाबदार गणवेश बदलून कमळाची फुले चितारलेला नवा गणवेश आणि मणिपुरी टोपी असा काहीसा प्रकार ते करणार आहेत. खाली खाकी रंगाची पॅण्ट असेल. पॅण्ट हाफ की फुल ते समजले नाही. हे असे पोरखेळ केल्याने सनातन धर्माचे काय कल्याण होणार ते त्यांनाच माहीत, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.
हेही वाचा – Sanatana Dharma row : भाजपाच्या सनातन धर्माचा हा खरा चेहरा, ठाकरे गटाची कडाडून टीका
मणिपुरातील हिंसा व जातीयवादाचा उद्रेक अशाने थांबणार नाही. संसदेच्या शे-पाचशे कर्मचाऱ्यांना मणिपुरी टोप्या घालायला देऊन सरकार बेगडे मणिपुरी प्रेम दाखवत आहे. मणिपुरात हिंसेचा नवा आगडोंब उसळला व त्यात चार जणांची गोळ्या घालून हत्या केली. सरकार संसदेच्या कर्मचाऱ्यांना मणिपुरी टोप्या घालत आहे व तिकडे मणिपुरातील दोन जमाती एकमेकांना गोळ्या घालत आहेत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटले आहे.
कॅनडात खलिस्तानी कारवाया
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे ‘जी-20’ संमेलनासाठी भारतात आले. कॅनडात खलिस्तानी अतिरेक्यांनी उचल खाल्ली असून हिंदुस्थानचे तुकडे तुकडे करू, अशा घोषणा कॅनडाच्या रस्त्यावर देणाऱ्यांना कॅनडाचे सरकार मोकळे का सोडत आहे? हा दहशतवाद कॅनडा खपवून घेत असेल तर भारतास कठोर पावले उचलावी लागतील, असे पंतप्रधान मोदी यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांना बजावले. तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘द्रमुक’मुळे ‘इंडिया’ आघाडीस कोणतेही तडे जाणार नाहीत, तर्क मांडत ठाकरे गटाचा दावा
भाजपा पुरस्कृत संघटानांची अतिरेकी कृत्ये
कॅनडा, पाकिस्तानसारख्या देशात भारतविरोधी दहशतवाद मान्य नसेल तर भारतात भाजपा पुरस्कृत काही संघटना धर्माच्या नावावर जी अतिरेकी कृत्ये करीत आहेत त्यांना मोदी सरकारने पाठीशी का घालावे? उत्तर प्रदेश, हरयाणा, गुरगाव, साताऱ्यातील हिंसेमागे कॅनडातील अतिरेकी नाहीत. ते आपल्याच सनातन धर्मातले लोक आहेत व अशा स्वधर्मी अतिरेक्यांना आवर घातला नाही तर धर्माचे रक्षण होण्याऐवजी अधःपतन होईल, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.