कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे हे आहे नाव, कोरोनाची दुसऱ्यांदाही होऊ शकते लागण

एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीलाही सहज होते संक्रमण

UK variant

दक्षिण आफ्रिकेतला कोरोना व्हायरसचा व्हेरीएंट हा इंग्लंडमध्ये आढळल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. पण कोरोनाचा नवीन पद्धतीचा (स्ट्रेन) व्हेरिएंट कसा आहे याबाबतची माहिती आता समोर येत आहे. हा व्हायरस तरूण पिढीला अधिक नुकसानकारक ठरू शकतो. महत्वाचे म्हणजे कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा कोरोना लशीवरही जास्त विरोधी आहे, असे दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांचे मत आहे. पण या नव्या व्हायरसचे नेमके काय धोके आहेत, याबाबतचे संशोधन अजुनही सुरू आहे. या नव्या व्हेरिएंटच्या नव्या लक्षणांमुळे आणखी कोणते आजार बळावतात तसेच कोणते उपचार द्यावे लागतील याबाबतचे संशोधन प्रगतीपथावर आहे. असाही एक धोका व्यक्त करण्यात येत आहे की या दक्षिण आफ्रिकेतील कोरोना व्हायरसच्या व्हेरीएंटमुळे पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते. ज्यांना आधीही कोरोना व्हायरसची लागण होऊन गेली आहे अशा व्यक्तींनाही या व्हायरसची लागण होण्याची शक्यता असल्याचे न्यूज १८ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.

या नव्या व्हेरिएंटचे नाव हे ५०१Y.V.२ असे आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला हा व्हायरस सहजपणे संक्रमित करू शकतो. पण ही चांगली गोष्ट नसून धोक्याची घंटा असल्याचे दक्षिण आफ्रिकेतील वैज्ञानिकांनी म्हटले आहे. इंग्लंडमध्ये आढळलेला व्हेरीएंट हा दक्षिण आफ्रिकेतील व्हेरीएंटशी मिळता जुळता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणूनच आपल्याला या रोखावे लागेल असे मत दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हायरस व्हेरीएंटमधील प्रमुख संशोधक डॉ रिचर्ड लेसेल्स यांनी स्पष्ट केले आहे.

एका आठवड्यातच ब्रिटनमध्ये नव्या कोरोना व्हायरसचा दुसरा स्ट्रेन आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट ह‌ॅकाँक यांनी याबाबत माहिती दिली आहे. पहिल्या स्ट्रेनपेक्षा हा दुसरा स्ट्रेन धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरा स्ट्रेन आधीच्या कोरोना व्हायरस आणि पहिल्या कोरोना स्ट्रेनपेक्षा सुपरस्प्रेडर असल्याचे समोर आले आहे. या दुसऱ्या कोरोना स्ट्रेनचा प्रादुर्भाव लवकर पसरतो. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या दोन लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पण आता यापूर्वी कुणी नवीन कोरोना व्हायरसचा रुग्ण आले आहेत का? याचा तपास केला जात आहे.