Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश New parliament : ...तर शोभेचा राजदंड काय कामाचा? ठाकरे गटाचा बोचरा सवाल

New parliament : …तर शोभेचा राजदंड काय कामाचा? ठाकरे गटाचा बोचरा सवाल

Subscribe

मुंबई : नव्या संसद भवनाच्या इमारतीचे (new Parliament building) उद्घाटन भव्य स्वरूपात पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत सन्गोलची (Sengol) म्हणजे राजदंडाची स्थापना केली. राजदंड आता आला म्हणजे यापुढे एक प्रकारे राजेशाहीची सुरुवात झाली. दिल्लीत लोकशाहीच्या नावाखाली नव्या बादशाहीचा राजदंड पोहोचला आहे. देशातील राज्यकारभारात राजधर्माचेच पालन होत नसेल तर तो शोभेचा राजदंड काय कामाचा? असा बोचरा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

देशात आज भीतीचे वातावरण आहे. सरकारला ज्यांची भीती वाटते त्यांच्या घरी पोलीस व ईडी पोहोचते व त्यांना अटक होते. या जुलूमशाहीविरोधात आवाज उठवण्याची सोय संसदेत नाही. मग नव्या संसदेचा महाल काय कामाचा? ऐतिहासिक संसदेला टाळे लावून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मालकीची वास्तू असल्याच्या थाटात नवा भव्य संसद महाल उभा केला. त्या महालात बोलण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्यास लोकशाहीचे मंदिर म्हणू नका. त्या महालात सरकारला धारदार प्रश्न विचारण्याची मुभा नसेल तर ‘सत्यमेव जयते’चा बोर्ड खाली उतरवा. त्या महालात राष्ट्रीय प्रश्नांवर गर्जना करण्यापासून रोखणार असाल तर संसदेच्या घुमटावरील तीन सिंहांचे भारतीय प्रतीक झाकून ठेवा, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

भव्य संसद महाल कशासाठी?

- Advertisement -

दिल्लीत मोदींचे राज्य आल्यापासून संसदेचे कामकाज जवळ जवळ बंदच असते. पंडित नेहरूंच्या काळात वर्षाला 140 दिवस किमान लोकसभेचे कामकाज चालत असे. आता ते 50 दिवसही चालत नाही. मग न चालवल्या जाणाऱ्या संसदेसाठी एक हजार कोटींचा भव्य संसद महाल कशासाठी? असा सवालही ठाकरे गटाने या अग्रलेखातून केला आहे.

चर्चेपासून पंतप्रधान मोदींनी सतत पळ काढला…

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (PM Jawaharlal Nehru) जास्तीत जास्त काळ संसदेच्या दोन्ही सभागृहांत उपस्थित राहत, विरोधी पक्षनेत्यांची भाषणे ऐकत. नेहरू प्रश्नोत्तरांच्या तासालाही आवर्जून उपस्थित राहत व सदस्यांच्या अनेक प्रश्नांना स्वतः उत्तरे देत. पंतप्रधान मोदी प्रश्नोत्तरांच्या तासाला कधीच हजर राहिले नाहीत व प्रश्नांना उत्तरे देण्याचा तर प्रश्नच उद्भवला नाही. चर्चेपासून त्यांनी सतत पळ काढला. संसदेत तेव्हा सर्वच विषयांवर चर्चा होत असे व पंतप्रधान चर्चेला उत्तेजन देत असत. आज विरोधकांनी अडचणीच्या विषयावर चर्चा मागितली की, सत्ताधाऱ्यांकडूनच संसद बंद पाडली जाते. विरोधी बाकांवरील सदस्यांना सापत्न वागणूक दिली जाते. हे लोकशाहीचे चित्र नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

नवी संसद उद्या अदानींच्या हवाली केली जाईल!

- Advertisement -

मोदी सरकारच्या काळात देशातील सार्वजनिक उपक्रम, विमानतळे, बंदरे सर्व काही मोदींच्या मित्रांच्या हवाली केले गेले. मोदीमित्र अदानी यांनी देश कसा लुटला, याच्या कहाण्या प्रसिद्ध झाल्या, पण विरोधी पक्षांनी त्या लुटमारीवर चर्चेची मागणी करताच संसद बंद पाडण्यात आली. उद्या ही नवी संसद चालविण्यासाठी मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या हवाली केली जाईल, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

देशाला कर्तव्य पार पाडावे लागेल…

नवे संसद भवन म्हणजे बादशहाचा महाल नाही. देशाच्या आशा-आकांक्षांचे ते प्रतीक आहे. ती फक्त दगड, विटा, रेतीने बांधलेली नक्षीदार इमारत नाही. त्या इमारतीत देशाच्या लोकशाहीचे पंचप्राण गुंतले आहेत. आम्ही त्या मंदिरास साष्टांग दंडवत घालीत आहोत! मोदी त्यांच्या स्वभावानुसार वागले. देशाला कर्तव्य पार पाडावे लागेल, अशी अपेक्षा या अगर्लेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -