नवी दिल्ली : केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा पहिला दिवस म्हणजे 18 सप्टेंबर हा जुन्या संसद भवनातील कामकाजाचा शेवटचा दिवस असेल. गणेश चतुर्थीला म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी संसदेचे कामकाज हे नवीन इमारतीतून सुरू करण्यात येणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेले नवीन संसद भवन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. 973 कोटी रुपये खर्चून बांधलेली ही इमारत 29 महिन्यांत पूर्ण करण्यात आली. ज्यानंतर मोठ्या दिमाखात या नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा 28 मे रोजी पार पडला. त्यानंतर आता गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या नव्या संसदेत कामकाजाला सुरुवात करण्यात येणार आहे. (New parliament : special session will be held in new parliament on occasion of Ganesh Chaturthi)
हेही वाचा – मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्या पाटणा उच्च न्यायालयाला सुप्रीम कोर्टाने सुनावले; म्हणाले- पुन्हा एकदा…
नवीन संसद भवनाचे मोठ्या उत्साहाने आणि सर्व धर्म गुरुंच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन पार पडले. त्यानंतर या नव्या संसदेतील कामकाजाला कधीपासून सुरुवात होणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यानुसार 19 सप्टेंबरला ज्या दिवशी गणरायाचे आगमन होते, त्यादिवशीच या नवीन संसद इमारतीत कामकाजाला सुरुवात होणार आहे. नव्या संसद भवनात काम सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीचे ‘लोकशाही संग्रहालय’मध्ये रूपांतर होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
1927 मध्ये बांधण्यात आलेल्या संसदेच्या जुन्या इमारतील आता 95 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 2020 मध्येच ही इमारत जास्त काळ वापरण्यात आल्याने खराब झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, भविष्यात खासदारांच्या जागा वाढल्या तर मग जुन्या संसद इमारतीत बसण्यासाठी पुरेशी जागा देखील नसणार हे सांगत नव्या इमारतीची निर्मिती करण्यात आली.
64 हजार 500 चौरस मीटरमध्ये बांधण्यात आलेल्या नवीन संसद भवनाला 4 मजले आहेत. त्याला 3 दरवाजे आहेत, त्यांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावे देण्यात आलेली आहेत. खासदार आणि व्हीआयपींसाठी स्वतंत्र प्रवेश मार्गिका देखील तयार करण्यात आलेल्या आहेत. नवीन इमारत जुन्या इमारतीपेक्षा 17 हजार चौरस मीटर मोठी आहे. नवीन संसद भवनावर भूकंपाचा कोणताही परिणाम होणार नाही, अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आली आहे. एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने हे नवीन संसद भवन तयार केले आहे.