(New Year 2025) नवी दिल्ली : मावळत्या 2024ला निरोप देऊन 2025 या नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. त्याचबरोबर नव्या वर्षातील संकल्प आणि त्यात घडणाऱ्या घटनांची चर्चाही सुरू झाली आहे. एका अहवालानुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जगाची लोकसंख्या सुमारे 8.09 अब्ज होईल. 2024मध्ये जगाच्या लोकसंख्येमध्ये सुमारे 7.1 कोटी लोकांची वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षात लोकसंख्येचा नवा उच्चांक नोंदवला जाईल. (Record breaking population on the first day!)
यूएस सेन्सस ब्युरोच्या अहवालानुसार, 2024मध्ये जगाच्या लोकसंख्येत झालेली वाढ ही 2023च्या तुलनेत थोडी कमी होती. परंतु तरीही ती जगाची लोकसंख्या वाढवण्यासाठी पुरेशी होती. त्यानुसार 2023मध्ये जगाच्या लोकसंख्येमध्ये 7.5 कोटींची वाढ नोंदवण्यात आली होती. तर आता, 2025च्या पहिल्याच दिवशी जगभरात प्रति सेकंद 4.2 जन्म आणि 2.0 मृत्यू होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : बीड प्रकरणावरून महाराष्ट्र तापलेला अन् अजित पवार थंड हवेच्या देशात
काही महिन्यांपूर्वीच भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. बराच काळ पहिल्या क्रमांकवर असलेला चीन आता दुसऱ्या क्रमांकावर आहे, असा अंदाज आहे. भारताचा उच्च जन्मदर आणि चीनच्या ‘एक मूल’ धोरणामुळे या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, चीनने आता लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी हे धोरण ‘एक मूल’ धोरण थंड बस्त्यात ठेवले आहे.
जागतिक लोकसंख्येच्या दृष्टीने सरते वर्ष चांगले ठरले नाही. इस्रायल, हमास आणि इतर शत्रू राष्ट्रांमध्ये सुरू असलेले युद्ध तसेच रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध यात अनेकांचा बळी गेला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष आपल्या नागरिकांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करताना दिसले. तर दुसरीकडे, युक्रेनमध्येही लष्करात तरुणांची कमतरता असल्याने सरकारने सैन्यभरतीचे वय कमी केल्याचे वृत्त आहे. (New Year 2025: Record breaking population on the first day!)
हेही वाचा – SS UBT Vs Modi Govt : चीन सीमांवर हजारो कृत्रिम गावे वसवीत आहे आणि…, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा