घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटलसीशिवाय कोरोनाला हरवणं शक्य! या देशानं दाखवून दिलं; एकही रुग्ण शिल्लक नाही!

लसीशिवाय कोरोनाला हरवणं शक्य! या देशानं दाखवून दिलं; एकही रुग्ण शिल्लक नाही!

Subscribe

गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून आख्ख जग कोरोनाच्या दहशतीखाली आहे. जगातल्या जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. ते शेकडो, हजारो, लाखोंच्या संख्येत आहेत. त्यामुळे आख्खं जग कोरोनाच्या प्रचंड दाढेखाली अडकलेलं असताना या सगळ्यामध्ये एक आशेचा किरण आता समोर आला आहे. न्यूझीलंड या देशानं कोरोनाला पूर्णपणे हरवून पहिला कोरोनामुक्त देश होण्याचा मान मिळवला आहे. या देशात सद्यघडीला एकही कोरोनाचा रुग्ण शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे लवकरच न्यूझीलंडमधली सर्व बंधनं हटवण्यात येणार आहेत. जगातल्या इतर देशांमध्ये अजूनही कोरोना ठाण मांडून बसलेला असतानाही आख्ख्या जगासाठी ही दिलासादायक बाब आहे. कारण कोरोनाच्या लसीशिवाय देखील कोरोनाला हरवणं शक्य आहे, हे न्यूझीलंडनं दाखवून दिलं आहे.

जगाचा उत्साह वाढवणारी खुशखबर!

आजघडीला जगभरातल्या सर्व देशांमध्ये मिळून एकूण ७० लाख ९९ हजार ९१९ कोरोनाबाधित आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ४ लाख ०६ हजार २०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या अमेरिकेत २० लाख ७७ हजारांच्या वर कोरोनाबाधित झाले आहेत. जगातल्या इतरही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण काही ठिकाणी हजारो तर काही ठिकाणी लाखोंच्या घरात आहेत. भारतात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा अडीच लाखांच्या वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमधून आलेली ही खूशखबर नक्कीच जगभरातल्या सरकार आणि प्रशासकांचा उत्साह वाढवणारी आहे.

- Advertisement -

शेवटचा कोरोनाबाधित २ दिवसांपूर्वी निगेटिव्ह

२५ मार्च रोजी न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये एकूण १४७४ कोरोनाबाधित सापडले. त्यातल्या २२ रुग्णांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे न्यूझीलंड देखील जगातल्या इतर देशांप्रमाणेच कोरोनाच्या विळख्यात सापडतो की काय? अशी भिती निर्माण झाली. मात्र, न्यूझीलंड सरकारने वेळोवेळी घेतलेले कठोर निर्णय, लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी आणि न्यूझीलंडच्या नागरिकांचं जबाबदार वर्तन यामुळे त्यांना कोरोनाला हरवणं शक्य झालं आहे. गेल्या १७ दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये एकही नवा कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. गेल्या १० दिवसांपासून कोरोनाच्या शेवटच्या बाधितावर उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्याचा देखील रिपोर्ट आला असून तो ही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे न्यूझीलंड आता पूर्णपणे कोरोनामुक्त देश ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -