न्यूझीलंडमध्ये दीड लाख गाई मारल्या जाणार

cows in new zealand
न्यूझीलंडमधील गायी

न्यूझीलंड हा देश शेतीप्रधान देश आहे. मात्र शेतीसोबतच या देशात मोठ्या प्रमाणावर पशूपालन केले जाते. या देशाच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट संख्या तर गायींचीच आहे. त्यामुळे न्यूझीलंड अर्थव्यवस्थेत डेअरी फार्मिंगचा महत्वाचा वाटा आहे. परंतु, मायकोप्लाज्मा बोविस नावाच्या संसर्गजन्य विषाणूंची इथल्या गायींना लागण झाली आहे. आणि हा विषाणू वेगाने पसरत असल्यामुळे त्याला संपवण्यासाठी न्यूझीलंड सरकारने विषाणूची लागण झालेल्या दीड लाख गायींना मारण्याचा निर्णय घेतला आहे.

मायकोप्लाज्मा बोविसची लक्षणं
न्यूझीलंडमध्ये एक कोटी एवढी गाईंची संख्या आहे. येथील ३८ पशूपालन केंद्रांमधल्या गायींमध्ये हा आजार आढळून आला आहे. या विषाणूंमुळे गायींना स्तनांवर सूज येणे, निमोनिया होणे तसेच इतर अनेक आजारांना बळी जावे लागते. शिवाय, हा विषाणू संसर्गजन्य असल्यामुळे तो वेगाने इतर गायींमध्ये फैलावतो आहे.

खाद्यपदार्थांवर नाही पण दूध उत्पादनावर परिणाम
न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेत डेअरी फार्मला अनन्यसाधारण महत्व आहे. येथून दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यामुळे गायींवरील या विषाणूचा नायनाट वेळीच करणे गरजेचे आहे. या विषाणूंमुळे गायींना आजार होतात. पण, त्यांच्या दुधावर किंवा दुधापासून बनणाऱ्या खाद्य पदार्थांवर परिणाम होत नाही. मात्र यामुळे गायींपासून होणाऱ्या दुधाचे उत्पादन कमी होत आहे.

कोट्यावधी रुपये खर्च करण्याचा निर्णय
मागील वर्षी एप्रिलमध्ये पहिल्यांदा मायकोप्लाज्मा बोविस हे विषाणू एका गाईमध्ये आढळले होते. या अगोदर युरोप आणि अमेरिकेतील गाईंमध्ये हा विषाणू आढळला होता. न्यूझीलंड प्रशासनाने या विषाणूंच्या नायनाट करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद घोषित केली आहे.

आतापर्यंत २४ हजार गाई मारल्या गेल्या आहेत
न्यूझीलंड प्रशासनाने आतापर्यंत २४ हजार गाई मारल्या आहेत. अजून १ लाख २८ हजार गाई मारण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.

जिथे विषाणू सापडतील, तिथेच गाईंना मारणार
न्यूझीलंडच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “जिथे जिवाणू सापडतील, तिथेच गायींना मारले जाईल. या गोष्टीचा शेतकऱ्यांनी विरोध करु नये. यात जर कुठली गाय धष्टपुष्ट असेल, तर बीफ म्हणून तिचा वापर केला जाईल. अन्यथा, शेतात कुठेतरी दफन केले जाईल.” न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री जेसिंडा अर्डर्न यांनीही ‘मायकोप्लाज्मा बोविस या विषाणूला संपविण्यासाठी हाच योग्य मार्ग असल्याचे सांगत गाईंना मारण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.