पुढची 30 ते 40 वर्ष भाजपचीच, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शहांचे वक्तव्य

पुढचे 30 ते 40 वर्ष भाजपचा काळ असेल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

Union Home Minister Amit Shah

पुढची 30 ते 40 वर्ष भाजपचा काळ असेल. या काळात भारत विश्वगुरू बनेल. घराणेशाही, जातीवाद हा देशाच्या राजकारणासाठी शाप आहे. जो देशासमोरच्या समस्यांना कारणीभूत आहे. असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. ही बैठक हैदराबाद येथे सुरू आहे.

तेलंगण आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये भाजप कैटुंबिक राजवट संपवेल आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशासह इतर राज्यांमध्ये सत्तेतही येईल, असे अमित शाह म्हणाले. 2014 पासून केंद्रात सत्तेत असलेला भाजप या राज्यांमध्ये सत्तेत नाही.

काँग्रेसवर आरोप –

काँग्रेस हा कुटुंबाचा पक्ष झाला आहे. त्यांचे काही सदस्य पक्षाच्या आतच लोकशाहीसाठी लढत आहे. गांधी कुटुंब अंतर्गत संघटनात्मक निवडणुका होऊ देत नाही. त्यांना पक्षावरील आपले नियंत्रण गमावण्याची भिती आहे. विरोधक असंतुष्ट आहेत आणि सरकार जे काही चांगले करते, त्याचा ते विरोधच करत असतात, असा आरोपही त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक –

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे शाह म्हणाले. यामध्ये दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाफीया जाफरी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. याचिकेत गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलींमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ लोकांना एसआयटीने दिलेल्या क्लिन चीटला आव्हान देण्यात आले होते. मोदी यांनी दंगलीमध्ये आपल्या कथित भूमिकेबाबत एसआयटी तपासाचा सामना केला होता आणि संविधानावर आपला विश्वास कायम ठेवला होता असे शाह म्हणाले.