PNBला ठगवणारा नीरव मोदी परदेशी बँकांचे कर्ज फेडणार

नीरव मोदी देशातील बँकेचे कर्ज बुडवून पळाला. मात्र आता परदेशी बँकाचे कर्ज फेडण्यासाठी त्याला मालमत्तेचा लिलाव करावा लागत आहे.

Nirav Modi
नीरव मोदी

भारतातील पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशी बँकाचे कर्ज फेडणार असल्याची माहिती मिळत आहे. एचएसबीसी न्यु यॉर्क (HSBC New York) आणि इस्राईल डिसकाऊंट बँक (IDB) या दोन बँकातील कर्जाची थकबाकी नीरव मोदी फेडणार आहे. नीरव मोदी चालवत असलेल्या अमेरिकास्थित कंपन्यांनी या दोन्ही बँकासोबत कर्ज फेडण्यासंबंधीचा करार केला आहे. न्युयॉर्क कोर्टाने दणका दिल्यानंतर मोदीच्या कंपन्यांनी बँकासोबत कर्जाची परतफेड करण्यासंबंधीच्या ठरावावर स्वाक्षरी केली असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड आणि फँटसी आयएनसी या दोन अमेरिकास्थित कंपन्यांनी २०१३ साली इस्राईल डिसकाऊंट बँकेतून एक कोटी २० लाख डॉलर्सचे कर्ज घेतले होते. तसेच या दोन्ही कंपन्यांनी एचएसबीसी बँकेसोबत एक कोटी ६० लाख डॉलर्सचे कर्ज उचलले होते. मात्र बँकाना परतफेड करण्यासाठी कर्जाचा हप्ता हा करार केलेल्या कर्जाच्या किमंतीपेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे. बँकाच्या एका निश्चित प्रक्रियेनंतर कर्जाचा हप्ता ठरवला जाईल.

दोन्ही बँकाच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मोदीच्या कंपन्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. या लिलावासाठी विश्वस्तांना नेमले असून थकबाकी असलेल्या रकमेइतकीच विक्री लिलावाच्या माध्यमातून केली जावी, असे निर्देश दिले आहेत.

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशी पळ काढलेला आहे. त्यानंतर नीरव मोदीच्या संपत्तीवर जप्ती आणावी, असे आदेश सक्तवसुली संचलनालयाने दिले होते. त्यामुळे देशातील बँकेना केराची टोपली दाखवत नीरव मोदीने परदेशी बँकातील बुडीत कर्जाची परतफेड केल्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.