नितीश कुमार आणि लालू यादव घेणार सोनिया गांधींची भेट, देशव्यापी महाआघाडीवर चर्चा होण्याची शक्यता

laluyadav and soniya gandhi

नवी दिल्ली – बिहारमधील महाआघाडीचे दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे लालू यादव रविवारी संध्याकाळी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. सहा वर्षांनंतर त्यांची सोनिया गांधींसोबतची ही पहिलीच भेट आहे. या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित राहतील, अशी अपेक्षा बिहारमधील दोन्ही नेत्यांना असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण सध्या राहुल गांधी केरळमध्ये आहेत, जे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहेत.

2015 मध्ये बिहार निवडणुकीपूर्वी नितीश कुमार आणि सोनिया गांधी यांची शेवटची भेट एका इफ्तार पार्टीमध्ये झाली होती. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राहुल गांधींची दिल्ली दौऱ्यात भेट घेतली होती. त्यावेळी सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात होत्या.

महाआघाडीवर चर्चा होण्याची शक्यता –

ही एक औपचारिक भेट असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये महाआघाडीला राष्ट्रीय पातळीवर नेण्यासह काही गंभीर विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. बिहारमधील नेते, विशेषत: नितीश कुमार 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी भाजपच्या विरोधात विरोधकांना एकत्र करण्याचे काम करत आहेत.

काँग्रेस अध्यक्ष निवडण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची  –

काँग्रेस आपला पुढचा अध्यक्ष निवडण्याच्या तयारीत असल्याने ही बैठकही महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे. शशी थरूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे या पदाच्या शर्यतीत प्रमुख उमेदवार मानले जात आहेत. मात्र, मनीष तिवारी, दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी या पदासाठी निवडणूक लढवण्याचे मन बनवले आहे.

नितीश कुमारांनी या नेत्यांची घेतली होती भेट –

नितीश कुमार यांनी आपल्या शेवटच्या दिल्ली दौऱ्यात अनेक प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली होती. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि डाव्या नेत्यांचा समावेश आहे.