मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कायम ठेवत नितीश कुमारांचे 17 वर्षे धरसोडीचे राजकारण

nitish kumar

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेडने भाजपाबरोबरची युती तोडली आहे. भाजपाबद्दलची नितीश कुमारांची नाराजी याआधीच स्पष्ट झाल्याने ते त्याच्याशी फारकत घेतील, हे स्पष्टच होते. पण गेल्या 17 वर्षांत नितीश कुमारांचे राजकारण हे कायम धरसोडीचेच राहिले आहे. विशेष म्हणजे, या धरसोडीच्या राजकारणात देखील आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कायम राहील याची दक्षता मात्र त्यांनी घेतली आहे.

बिहारमध्ये गेले काही दिवस राजकीय हालचालींना वेग आला होता. आपला पक्ष फोडण्याचा तसेच आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून पक्षाचे नुकसान करण्याचा प्रयत्न भाजपा करीत असल्याचा आरोप जदयूने केला होता. त्याच अनुषंगाने तिरंग्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी 17 जुलैला बोलावलेली बैठक, 22 जुलैला तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निरोप देण्यासाठी आयोजित स्नेहभोजनाचा कार्यक्रम, 25 जुलैला झालेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी आणि काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली नीती आयोगाची बैठक या चारही वेळेस नितीश कुमार अनुपस्थित राहिले होते. तर दुसरीकडे, जदयूने काँग्रेसबरोबर जवळीक वाढवली होती. नितीश कुमार यांनी आज सर्व आमदार व खासदारांची बैठक घेतली आणि त्यानंतर भाजपाला धक्का दिला. आता काँग्रेस तसेच राजदच्या मदतीने जदयू नव्याने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

तथापि, गेल्या 17 वर्षांत जदयूने भाजपाला दिलेला हा दुसरा धक्का आहे. 1999च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केवळ जनता दलच होते. त्यातील एका गटाने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला साथ दिली. त्यानंतर या पक्षाची दोन शकले झाली. 2003मध्ये जदयू अस्तित्वात आली. 2005मधील बिहार निवडणूक भाजपा आणि जदयूने एकत्रितपणे लढविली. त्यावर्षी दोन वेळा निवडणूक झाली. पहिल्यांदा कोणालाच बहुमत मिळाले नाही. तर, दुसऱ्या वेळी भाजपा-जदयूचे सरकार स्थापन झाले आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले.

सन 2010च्या निवडणुकीलाही हे दोघे एकत्रितपणे सामोरे गेले. पण जेव्हा पंतप्रधानपदासाठी भाजपाकडून नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. तेव्हा 2013मध्ये नितीश कुमार यांनी भाजपाशी फारकत घेतली आणि राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसचा हात पकडला. 2015मध्येही राजद आणि काँग्रेसला सोबत घेऊन जदयूने निवडणूक लढविली. 2017मध्ये नितीश कुमार आणि राजदचे तेजस्वी यादव यांच्यात बिनसले. त्यामुळे नितीश कुमारची जदयू पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाली. 2020मध्ये भाजपा-जदयूने एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढविली आणि सत्ता स्थापन केली. जदयूच्या जागा कमी असल्या तरी, दिलेला शब्द पाळत भाजपाने नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले. पण आता पुन्हा नितीश कुमार दुसऱ्यांदा भाजपाशी काडीमोड घेतला आहे आणि यावेळी देखील आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाणार नाही याची काळजी देखील घेतली आहे.