No Two-Finger Test : महिला अधिकाऱ्याच्या बलात्कार प्रकरणी IAF चे स्पष्टीकरण

Air Chief Marshal VR Chaudhari

सध्या भारतीय वायुदलात गाजत असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या बलात्कार प्रकरणात भारतीय वायु सेनेचे प्रमुख व्ही.आर.चौधरी यांनी महत्वाचा खुलासा केला आहे. या प्रकरणात कोणतीही टू फिंगर टेस्ट केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महिलेची अशी कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. तसेच महिलेच्या सेक्शुअल हिस्टरी चौकशीबाबतचेही वृत्त त्यांनी फेटाळले. या प्रकरणात कोणतीही टू फिंगर टेस्ट झाली नसून संपुर्ण प्रकरणात चौकशी अहवालावर आधारीतच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे चौधरी यांनी स्पष्ट केले. पीटीआय संस्थेशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

या प्रकरणातील आरोपी २९ वर्षीय फ्लाईट लेफ्टिनंटवर कोर्ट मार्शल कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तामिळनाडूच्या कोइंबतूर न्यायालयाने हे प्रकरण भारतीय वायू सेनेकडे हस्तांतरीत करत असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानेही स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय वायू सेनेच्या डॉक्टर्सकडून बंदी घालण्यात आलेली टू फिंगर टेस्टच्या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे हे उल्लंघन असून राईट टू प्रायव्हसीचेही हे उल्लंघन असल्याचेही महिला आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ज्यादिवशी एअर फोर्सच्या प्रशिक्षणासाठी महिला कोइंबतुर येथे गेली होती, त्यादिवशी या पीडित महिलेसोबत अतिप्रसंग घडला. दोन आठवडे आधी ती महिला राहत असलेल्या रूममध्ये हा बलात्काराचा अतिप्रसंग घडला. ज्यादिवशी घटना घडली त्यादिवशी महिला जखमी झाल्याचा जबाब तिने दिला आहे. तिने काही औषधे घेतली होती. सकाळी उठल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पीडित महिलेने नोंदवली आहे. भारतीय वायुसेनेने केलेली कारवाई समाधानकारक नसल्यानेच महिलेने पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

सुरूवातीला या महिलेला भारतीय वायु सेनेकडून तक्रार रद्द करण्याचा अर्ज दोनवेळा देण्यास सांगण्यात आले. पहिल्यांदा लेखी अर्ज देण्यात सांगण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात दोषारोप पत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले. पण यासाठी महिलेने विरोध केला.

गांधीपुरमच्या पोलिस ठाण्यात या प्रकरणी महिलांनीच तपास केला आहे. सेक्शन ३७६ अंतर्गत या प्रकरणात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा या प्रकरणी दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गांधीपुरम पोलिस चौकशी करत आहेत.


हेही वाचा – आव्हाड बदनामी प्रकरणी सोमय्यांना अखेर जामीन, सेशन कोर्टाने ठेवल्या कठोर अटी