मुंबई : कांद्यावरील निर्यातशुल्कावरून शेतकरी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने राज्यातील 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल दराने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यांना तेवढा दर मिळत नसल्याचे सांगण्यात येते. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, 2012मधील शरद पवार यांचा एक किस्सा ट्विटरवर शेअर करत, आता खाणाऱ्याचे दिवस असल्याची टीका केली आहे.
सन 2012 साली मी आणि आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब मनमाड येथे स्वातंत्र्यसेनानी वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करायला गेलो होतो. मनमाडला पोहचल्यानंतर अनेक शेतक-यांनी साहेबांची भेट घेतली व तेव्हाचे अर्थमंत्री कांद्याच्या बाबतीत काही महत्वाचा निर्णय घेणार आहेत;…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 24, 2023
कांद्याच्या निर्यात शुल्काला विरोध करत नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांनी यासंबंधीच्या अध्यादेशाची सोमवारी होळी केली होती. नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर जपानदौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत, कांद्याच्या प्रश्नाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणे झाले असल्याचे सांगितले. तसेच, केंद्र सरकार 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल दराने 2 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार असल्याचे जाहीर केले.
नाफेडने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित 2 हजार 410 प्रतिक्विटंल दराने कांदाखरेदी करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात कांद्याचे लिलाव गुरुवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला. पण तेवढा भाव मिळत नसल्याची तक्रार आहे.
हेही वाचा – “कांद्यानंतर आता साखरेवरील निर्यात शुल्क वाढेल”, शरद पवारांनी व्यक्त केली भीती
या सर्व प्रकारावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सन 2012 साली मनमाड येथे स्वातंत्र्यसेनानी वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास मी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करायला गेलो होतो. मनमाडला पोहोचल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली व तेव्हाचे अर्थमंत्री कांद्याच्या बाबतीत काही महत्वाचा निर्णय घेणार आहेत आणि तो शेतकऱ्यांच्या विरोधात जाईल, अशी तक्रार त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. पवार यांनी देखील त्यांची तक्रार समजून घेतली आणि मला सांगितले की, आपण हॅलिकॉप्टरने आलो आहोत, पण मला इथून दिल्लीला जावे लागेल आणि हा निर्णय रद्द करून घ्यावा लागेल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
तिथूनच त्यांनी आपल्या पी.ए.ला पी. चिदंबरम यांना फोन लावायला सांगितले. पी. चिदंबरम यांना फोनवर सांगितले की, मी येत आहे तर उद्या सकाळी आपण भेटूयात आणि या निर्णयावर चर्चा करुयात. मुंबईहून खासगी विमान ओझर विमानतळावर पोहचले. ओझर विमानतळावरुन शरद पवार दिल्लीला रवाना झाले आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील निर्णय रद्द करून घेतला, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.
हेही वाचा – राज्य सरकार आता गप्प का? कांदा लिलावावरून रोहित पवार यांचा सवाल
शेतकऱ्यांच्या दु:खाची जाण असलेला व प्रसंगी शेतकऱ्यांच्या बाजूने कणखर उभे राहणारे नेतृत्व म्हणजे शरद पवार. शेतकरी जगला तर देश जगेल ही भावना मनात असलेले नेते म्हणजे शरद पवार. पण आता मात्र जो कांदा पिकवतो, तो मेला तरी चालेल आपण जगातून कुठूनही कांदा आणू शकतो व खाणाऱ्याला विकू शकतो. आता खाणाऱ्याचे दिवस आले आहेत. पिकवणाऱ्याचे दिवस नाहीत. पिकवणारा मेला तरी चालेल खाणारा जगला पाहिजे, हे नवीन धोरण आले असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे.