(NRI Voting) नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून लोकसभा निवडणुकीत अनिवासी भारतीय (NRI) मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, अनिवासी भारतीयांनी मतदार म्हणून नोंदणी करण्यात मोठा उत्साह दाखवला होता. सुमारे 1.2 लाख लोकांनी मतदारांनी नावे नोंदवली होती. (Apathy among NRIs regarding Lok Sabha polls)
निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार 2024मध्ये 1 लाख 19 हजार 374 अनिवासी भारतीय मतदारांची नोंदणी झाली होती, त्यापैकी केरळमध्ये सर्वाधिक 89 हजार 839 अनिवासी भारतीय मतदार होते. 2019मध्ये 99 हजार 844 अनिवासी भारतीयांनी मतदार म्हणून नोंदणी केली होती. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी केवळ 2 हजार 958 परदेशी भरतीय मतदार भारतात आले होते. त्यापैकी 2 हजार 670 मतदार एकट्या केरळमधील होते, असे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूसारख्या अनेक मोठ्या राज्यांमधील अनिवासी भारतीयांनी मतदान केलेच नाही.
हेही वाचा – SS UBT Vs NDA Govt : हिंदुस्थान हा मोदी-शहा सरकारच्या बापजाद्यांची कमाई नाही, ठाकरे गटाचा संताप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत 885 अनिवासी भारतीय मतदारांपैकी फक्त दोनच नागरिकांनी मतदान केले. महाराष्ट्रात जवळपास अशीच परिस्थिती होती. एकूण 5 हजार 97 अनिवासी भारतीय मतदारांपैकी फक्त 17 मतदारांनी मतदान केले. आंध्र प्रदेशात 7 हजार 927 नोंदणीकृत अनिवासी भारतीय मतदार होते, परंतु केवळ 195 मतदानासाठी आले होते, असे आकडेवारीवरून दिसते. आसाममधील 19 नोंदणीकृत मतदारांपैकी एकानेही मतदान केले नाही. बिहारमध्येही 89 एनआरआय मतदारांपैकी एकानेही मतदानाचा हक्क बजावला नाही. गोव्यात 84 एनआरआय मतदारांपैकी कोणीही मतदान केले नाही.
हे आहे कारण…
सध्याच्या निवडणूक कायद्यानुसार नोंदणीकृत अनिवासी भारतीयांना आपापल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी यावे लागते. त्यांना त्यांच्या ओळखीचा पुरावा म्हणून त्यांचा मूळ पासपोर्ट दाखवावा लागतो. त्यामुळेच बहुतांश अनिवासी भारतीय मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. एनआरआय मतदानात घट होण्यामागे अनेक कारणे असल्याचे मानले जाते. प्रामुख्याने, तेवढा वेळ उपलब्ध नसणे तसेच प्रचंड भाडे विचारात घेतले जाते. त्यामुळे लोक मतदानाला येण्याचे टाळतात. (NRI Voting: Apathy among NRIs regarding Lok Sabha polls)