नुपूरचा शिरच्छेद करणाऱ्याला घर देणारं–अजमेर दर्ग्याच्या खादिमचा व्हिडीओ व्हायरल

अजमेर दरग्याचे खादिम सलमान चिश्ती यांचा चिथावणीखोर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

उदयपूर य़ेथील टेलर कन्हैयालाल आणि अमरावतीचे उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर देशातील वातावरण तापले आहे. याचदरम्यान, अजमेर दरग्याचे खादिम सलमान चिश्ती यांचा चिथावणीखोर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ते भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करणाऱ्याला बक्षिस म्हणून घर देण्याची घोषणा करत आहेत.

सलमान चिश्ती याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असून तो हिस्ट्रीशीटरही आहे. उदयपूर येथे नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने कन्हैयालाल याची गळा चिरुन हत्या करण्यात आली. त्याआधी अमरावतीमध्येही नुपूर यांचे समर्थन केल्याने उमेश कोल्हे या केमिस्टची त्याच्याच मित्राने हत्या केल्याचे समोर आले. या दोन्ही घटनांनी देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनांचे थेट पाकिस्तान कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. आतापर्यंत याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान सलमान चिश्तीचा दोन मिनिट पन्नास सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात तो धर्मिक भावनांचा हवाला देत नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची चिथावणी देत आहे. तसेच नुपूर यांची हत्या करणाऱ्याला बक्षिस म्हणून घर देणार असेही तो सांगत आहे.

तसेच आधीसारखं आता काही राहीलं नाही. नाहीतर हे बोललो नसतो. पण शपथ आहे मला माझ्या जन्मदात्या आईची मी तिला सगळ्यांसमोर गोळ्या घातल्या असत्या. आजही मी ठामपणे सांगतोय की मला माझ्या मुलांची शपथ आहे मी तिला गोळ्या घालून ठार केलं असतं. पण आता जो कोणी नुपूर शर्माचे शिर मला आणून देईल त्याला मी माझे राहते घर देऊन टाकीन आणि निघून जाईन हा माझा शब्द आहे. असे सलमान या व्हिडीओमध्ये आव्हान करताना दिसत आहे. सलमानच्या या व्हिडीओनंतर अजमेर येथील अलवर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.