सत्य बोलणं बंडखोरी असेल तर मग आम्ही पण बंडखोर आहोत –नुपूर शर्माला साध्वी प्रज्ञाचे समर्थन

साध्वी यांनी पैगंबर मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलेल्या नुपूर शर्मा यांना पाठींबा दर्शवला आहे.

वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. साध्वी यांनी पैगंबर मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलेल्या नुपूर शर्मा यांना पाठींबा दर्शवला आहे. सत्य बोलणं बंडखोरी असेल तर आम्ही देखील बंडखोर आहोत असे साध्वी यांनी टि्वट केले आहे. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

साध्वी यांनी या टि्वटमध्ये नुपूर शर्मा यांचे समर्थनच केले आहे. सत्य बोलणं म्हणजे बंड करणं असेल तर आम्ही पण बंडखोर आहोत. जय सनातन, जय हिंदुत्व…असे साध्वी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. मुस्लिमांबाबत खरं बोलल्यावर इतका त्रास का होतो? असा सवाल करत साध्वी यांनी कमलेश तिवारीचा उ्ललेख केला तसेच जे आहे ते सांगितल्यावर त्याची हत्या करण्यात आली असेही त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर मी नेहमी खरं बोलत असल्यानेच बदनाम असल्याचंही साध्वी यांनी म्हटल आहे. पण काहीही झाले तरी हे देखील एक सत्य आहे की (ज्ञानवापी) शिव मंदिर होते आणि राहणार आहे. त्याला कारंजा म्हणणे आमच्या हिंदू मानदंड, हिंदू देवी देवता, सनातनवरच आघात आहे. यामुळे आम्ही सत्य हे सांगणारच. असेही त्या म्हणाल्या. पण त्यावरच साध्वी थांबल्या नसून त्यांनी थेट एका समुदायालाच आव्हान करत आमचे खरे रुप काय आहे ते आम्हांला एकदा सांगाच. आम्ही ते स्वीकार करतो. मग जर आम्ही तुमचे खरं रुप सांगतोय तर त्याचा इतका त्रास का होतोय. याचा अर्थ इतिहास हा नक्कीच घृणास्पद आहे. नेहमी निधर्मी लोकच हे कृत्य करतात. आमच्या हिंदू देवी देवतांवर चित्रपट बनवले जातात. त्याचे दिग्दर्शन केले जाते. निर्मितीही केली जाते आणि शिव्याही दिल्या जातात. हे आज होत नसून यांचा संपूर्ण तसा इतिहासच आहे.

तसेच हा भारत असून हिंदुचा आहे. येथे सनातन जिंवत राहणार. त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आमची असून आम्ही ती योग्यरितीने पार पाडणार असल्याचेही साध्वी यांनी म्हटले आहे. दरम्यान भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याने इस्लामिक देशांनी मोदी सरकारवर कडाडून टीका करत निषेध व्यक्त केला आहे. याचे भारत आणि आखाती देशांतील व्यवहारांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याने भाजपने शर्मा यांच्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नसल्याचे सांगत हात झटकले. तसेच शर्मा यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे.