Barack Obama Covid-19 Positive: बराक ओबामांना कोरोनाची लागण; पंतप्रधान मोदींनी लवकर बरे होण्यासाठी केली प्रार्थना

Obama tests positive for Covid-19, PM Modi wishes him speedy recovery
Barack Obama Covid-19 Positive: बराक ओबामांना कोरोनाची लागण; पंतप्रधान मोदींनी लवकर बरे होण्यासाठी केली प्रार्थना

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याबाबतची माहिती ओबामा यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे. बराक ओबामा म्हणाले की, ‘मी कोरोनाची चाचणी केली. डॉक्टरांच्या मते, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या घशात खवखव होत आहे. परंतु मी सध्या ठीक आहे.’ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बराक ओबामा लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

बराक ओबामा यांची पत्नी मिशेल यांची देखील कोरोनाची चाचणी करण्यात आहे. परंतु त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आहे. बराक ओबामा यांनी ट्वीट करत लसीकरण वेगाने केल्यामुळे सरकारचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ट्वीटद्वारे लिहिले की, ‘बराक ओबामा व त्यांच्या कुटुंबियांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.’

दरम्यान चीनमध्ये कोरोना महामारी आता हळूहळू भयानक रुप धारण करत आहे. चीनच्या अनेक शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. चीनमध्ये रविवारी २००० नवे कोरोनाबाधित आढळले. यामधील २० रुग्ण राजधानी बीजिंगमध्ये आढळले होते.

चीनच्या आरोग्य विभागाच्या मंत्रालयानुसार, २ वर्षांनंतर पहिल्यांदाच चीनमध्ये २ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. नॅशनल हेल्थ कमिशननुसार फेब्रुवारी २०२० नंतर हा कोरोनाबाधितांचा दैनिक आकडा सर्वाधिक मोठा आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे चीनमधील काही शहरांमध्ये पुन्हा निर्बंध लादण्यात आले आहेत. लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.


हेही वाचा – corona Variant : डेल्टा आणि ओमिक्रॉनमधून नवा व्हेरीएंट ? WHO च्या अभ्यासात खुलासा