घरताज्या घडामोडी१६२ कोटींचा पेन्शन घोटाळा; ७० हजार बनावट पेन्शन धारक सापडले!

१६२ कोटींचा पेन्शन घोटाळा; ७० हजार बनावट पेन्शन धारक सापडले!

Subscribe

देशात एकीकडे कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होऊ लागला असतानाच दुसरीकडे तब्बल १६२.३५ कोटींचा पेन्शन घोटाळा उघड झाला आहे. पंजाब सरकारने ७० हजारहून जास्त बनावट पेन्शनधारकांची माहिती जमा केली असून त्यातून एक मोठं पेन्शन घोटाळा रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. ३० ते ४० वर्ष वयोगटातल्या महिला आणि पुरुषांना ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातले दाखवून त्यांच्यामार्फत दोन वर्षांपासून अशाच पद्धतीने पेन्शनचे पैसे काढले गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये खोलवर मुरलेल्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं उघडी पडल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

२० जिल्ह्यांमध्ये सापडले बनावट पेन्शनधारक

या प्रकारामध्ये पंजाबमधल्या २० जिल्ह्यांमधून ७० हजार १३७ बनावट पेन्शन खाती आणि त्यांमधून पैसे काढणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व २० जिल्ह्यांच्या उप जिल्हाधिकाऱ्यांना अशा सर्व व्यक्तींकडून त्यांनी आत्तापर्यंत अशाप्रकारे काढलेली पेन्शनची रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं देखील बजावण्यात आलं आहे. या घोटाळ्याची पाळंमुळं थेट २०१५पर्यंत मागे जात असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. यामध्ये सरकार आणि प्रशासनातील प्रमुख व्यक्ती, राजकीय व्यक्ती देखील सहभागी असल्याचं समोर आलं आहे.

- Advertisement -

या सर्व बनावट पेन्शन धारकांनी कागदपत्रांसोबत चुकीचे पत्ते दिले असून यामध्ये त्यांना सामाजिक सुरक्षा विभाग आणि महिला व बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांची मदत मिळाल्याचं बोललं जात आहे. अनेक पेन्शन धारकांनी २ वर्षांहून जास्त काळापासून त्या नावावरची पेन्शन काढल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराच्या सविस्तर तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -