नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे शुक्रवारी (20 डिसेंबर) सकाळी निधन झाले. वयाच्या 89 व्यावर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंडियन नॅशनल लोक दल (INLD) चे ते प्रमुख होते. 1989 मध्ये ते पहिल्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतरही ते अनेकदा मुख्यमंत्री राहिले आहेत. गेल्या आठवड्यापासून ते आजारी होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना मेडिसिटी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक खालावल्यामुळे त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर डबवली येथील तेजखेडा या वडिलोपार्जित गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. (OM Prakash Chautala haryana former cm passed away)
हेही वाचा : Parliament session : गदारोळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज संस्थगित, सत्ताधारी घाबरल्याचा विरोधकांचा आरोप
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी चौटाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “INLD सुप्रीमो आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन ही अत्यंत दुःखद आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. आयुष्यभर त्यांनी राज्य आणि समाजाची सेवा केली. ही देशाची आणि हरियाणा राज्याच्या राजकारणाची कधीही भरून न येणारी हानी आहे.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. ओमप्रकाश चौटाला हे भारताचे माजी उपपंतप्रधान देवी लाल यांचे पुत्र होते. हरियाणाच्या राजकारणामध्ये ते एक मुख्य चेहरा होते. त्यांना दोन मुले आणि तीन मुली आहेत.
ओमप्रकाश चोटाला यांची मुले अभयसिंह चौटाला आणि अजयसिंह चौटाला हेही राजकारणात सक्रिय आहेत. ओमप्रकाश चौटाला यांचे नातू दुष्यंत चौटाला हे मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी होते. 2 डिसेंबर 1989 रोजी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. यावेळी ते 171 दिवस या पदावर होते. त्यानंतर 12 जुलै 1990 रोजी मुख्यमंत्री झाले. यावेळी ते फक्त 5 दिवस मुख्यमंत्री राहिले. 22 मार्च 1991 रोजी चौटाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. यावेळी ते 15 दिवस या पदावर होते. 24 जुलै 1999 रोजी ते मुख्यमंत्री झाले ते 2 मार्च 2000 पर्यंत त्यांनी हा कार्यभार सांभाळला. तर, 2000 मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.