राष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून विरोधकांमध्ये फाटाफूट

Draupadi Murmu

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीला जेमतेम तीन दिवस शिल्लक असतानाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा पाठिंबा वाढत आहे. त्यांचे समर्थन करण्याच्या मुद्यावरूनच विरोधकांमध्ये फाटाफूट होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, विरोधकांच्या बैठकीत यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दर्शविणारेच आता मुर्मू यांचे समर्थन करत आहेत.

अलीकडेच महाराष्ट्रात शिवेसेनेने तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध विरोधक अशा या संघर्षात काही राज्यांतील आघाडी अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या आघाडी संपुष्टात आल्या तर, सर्वाधिक फटका काँग्रेसला बसू शकतो.

महाराष्ट्रात शिवसेनेतील सत्ताधारी शिंदे गटाने द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नक्की कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचेच लक्ष होते. आधी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर अन्य पक्ष होते. आता आघाडी पायउतार झाली असली तरी, आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेक़डे सर्वांचेच लक्ष होते. पण शिवसेनेनेही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसने नाराजी जाहीर केली होती. पण आणखी पडसाद अजून तरी उमटले नाहीत.

हेही वाचा – वाट बघण्यालाही मर्यादा असतात, शिंदे गटाचा ठाकरेंना अप्रत्यक्ष अल्टिमेटम

झारखंडमध्ये झामुमोच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीचे सरकार आहे. विशेष म्हणजे, तिथे झामुमो आणि काँग्रेसमध्ये कुरबूर सुरू असल्याची चर्चा आहेच. त्यातच आता झामुमोने मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने दोन्ही पक्षांतील दरी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे काँग्रेस समर्थन करत असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिला आहे.

उत्तर प्रदेशातही सुहैलदेव भारतीय समाज पार्टी (एसबीएसपी) आणि समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी होण्याची चर्चा आहे. त्यातच एसबीएसपीचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी आज द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला देखील उपस्थित होतो, असेही त्यांनी सांगितले. सपाने यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी आरएलडी, एसबीएसपी, महान दल, प्रगतीशील समाजवादी पार्टी- लोहिया व अन्य पक्षांबरोबर निवडणूक लढविली. पीएसपी-एल प्रमुख शिवपाल यादव यांनी यापूर्वीच मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर, महान दल आणि जनवादी पार्टी (समाजवादी) हे दोघेही सपापासून विभक्त झाले आहेत.