नवी दिल्ली : लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत अनेक मुद्द्यांवरून त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी विरोधकांनी ‘मणिपूर-मणिपूर’च्या घोषणा दिल्या. पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेच केवळ सभागृहात विरोधकांच्या बाजूमध्ये बसून होते. त्यामुळे त्यांच्या एकटेपणाची सर्वत्र चर्चा सुरु होती.
अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर हिंसाचावर बोलत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी कॉंग्रेसच्या राहुल गांधीसह सोनिया गांधी हे सभात्याग करीत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील यांनाही यावेळी सभागृहातून वॉकआऊट केला. यावेळी मात्र, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे विरोधकांच्या वॉकआऊट नंतर तब्बल एक ते दीड तास सभागृहात बसून होते. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, त्यांनी आपण अजित पवार यांच्याच बाजुने आहोत असे यातून दाखवून दिले.
#WATCH | Opposition MPs walk out of the Lok Sabha as Prime Minister Narendra Modi speaks on #NoConfidenceMotion pic.twitter.com/2kYKRBiP1Z
— ANI (@ANI) August 10, 2023
…आणि मोदी बोलले
विरोधकांच्या सभात्यागानंतर पंतप्रधान मोदींनी मणिपूरवर बोलायला सुरुवात केली. मणिपूरच्या हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या आरोपींना कडक शिक्षा देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. येत्या काळात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल याची मी खात्री देतो आणि मणिपूरमध्ये शांतीचा सूर्य उगवेल असेही आश्वासन त्यांनी यावेळी देशवासीयांना दिले.
हेही वाचा : मोदींवरील टीकेचा परिणाम; काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित
सभागृहातही दिसली राष्ट्रवादीत फूट
सभागृहात विरोधकांच्या वॉकआऊटमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गाटातील खासदारांचा समावेश होता, परंतू अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे बसून होते. या कृतीमुळे संसदेच्या लोकसभा सभागृहातही राष्ट्रवादीमधील दोन्ही गटातील फूट स्पष्टपणे दिसून आली.