अन्यथा कनिष्ठ डॉक्टरांनी हॉस्टेल खाली करावे; ममता बॅनर्जींचा डॉक्टरांना इशारा

कनिष्ठ डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाची दखल घेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी हॉस्पिटल गाठले.

Mamata Banerjee
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात सोमवारी एका रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराने डॉक्टरांशी गैरवर्तन केले. त्यामुळे सुरक्षिततेच्या मागणीसाठी कनिष्ठ डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनाची दखल घेत ममता बॅनर्जींनी डॉक्टरांना कामावर रूजू व्हा, अन्यथा हॉस्टेल खाली करा असा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर एसएमकेएम हॉस्पीटलच्या आपत्कालिन विभागात उपचार सेवा सुरु करण्यात आली.

ममता बॅनर्जींची सरकारी हॉस्पिटलला भेट

डॉक्टरांच्या संपामुळे पश्चिम बंगालमधील सरकारी हॉस्पिटलमधील रुग्णांचे हाल झाले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी सरकारी रुग्णालयांना भेट दिली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी सर्व डॉक्टरांनी चार तासात कामावर परता, जे डॉक्टर असे करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराच त्यांनी डॉक्टरांना दिला. तसेच संप मागे न घेतल्यास कनिष्ठ डॉक्टरांनी हॉस्टेल खाली करावे असेही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.

आंदोलनामागे भाजपा आणि माकपाचा हात

यावेळी कोलकाताच्या सरकारी एसएमकेएम रुग्णालयात आंदोलनकर्त्या कनिष्ठ डॉक्टरांनी ममता बॅनर्जी न्याय हवा म्हणून नारे लावले. दरम्यान कनिष्ठ डॉक्टरांच्या या आंदोलनामागे भाजपा आणि माकपाचा हात असल्याचेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.