घरदेश-विदेशAMU च्या १८ प्राध्यापकांसह ४० कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू; गहलोत म्हणाले, हा नवा...

AMU च्या १८ प्राध्यापकांसह ४० कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू; गहलोत म्हणाले, हा नवा व्हेरिएंट तर नाही?

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असताना अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU) मध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. AMU मध्ये गेल्या २२ दिवसात, ४० कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये १८ प्राध्यापकांचा समावेश आहे. अजूनही बऱ्याच प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही रुग्णालयात तर काही कर्मचारी घरी क्वारंटाईन असून कोरोनाचे उपचार घेत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट आहे का? याची चौकशी लवकरात लवकर करण्यात यावी असेही आदेश दिले आहेत.

गहलोत यांनी ट्वीट करून असे लिहिले की, “गेल्या २० दिवसात अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे १८ सेवा देणाऱ्या प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू झाला. हे अतिशय वाईट आणि चिंताजनक आहे. कोरोना विषाणूचा हा नवा व्हेरिएंट तर नाही ना! याची चौकशी झाली पाहिजे. कोरोनाशी संबंधित प्रत्येक बाबी गांभिर्याने घ्या, हे सद्यस्थितीत महत्त्वाचे आहे.” दरम्यान, अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीशी संबंधित इतक्या लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर प्रशासन काहीच बोलायला तयार नाही किंवा योग्य आकडेवारी देण्यासही तयार नाही.

- Advertisement -

अचानक इतक्या मोठ्या प्रमानात झालेल्या मृत्यूनंतर कोरोनाचा नवा व्हेरिएंट आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर एएमयूचे व्हीसी तारिक मन्सूर यांनी नवी दिल्लीच्या सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी येथे काही नमुने पाठवले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने निवडलेल्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या कोविड लॅबने हे नमुने एकत्र केले. या नमुन्यांसह प्राध्यापक मन्सूर यांनी आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव यांनाही पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

त्यांनी पत्रात असे लिहिले, “हे तुमच्या लक्षात आणून द्यावे लागेल की एएमयू शिक्षक, विद्यापीठ कॅम्पस आणि आसपासच्या भागात राहणारे इतर अनेक सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे कोरोनाने निधन झाले आहे. विद्यापीठालगतच्या सिव्हिल लाईन्स एरियामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या विषाणूचा प्रसार होत असल्याची शंका आहे.” प्राध्यापक मन्सूर यांनी असेही लिहिले की, “कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आहे की नाही हे शोधण्यासाठी आमच्या प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी आयसीएमआरच्या संबंधित विभागास आम्ही विनंती करतो.”

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -