दिल्लीमध्ये ओवैसी यांच्या घरावर हल्ला; पोलिसांत तक्रार दाखल

संसद मार्ग पोलीस ठाण्यात ओवैसी यांनी ही तक्रार दिली आहे. या हल्ल्याबाबत ओवैसी म्हणाले, काही अज्ञातांच्या समूहाने घरावर दगडफेक केली. घराच्या खिडकीचे नुकसान केले. मी रात्री साडेअकराच्या सुमारास घरी गेलो. तेव्हा घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. घरात दगडांचा खच पडला होता. मला घरकाम करणाऱ्या नोकरांनी सांगितले की, साडेपाचच्या सुमारास हल्लेखोरांनी घरावर हल्ला केला. 

 

नवी दिल्लीः एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली येथील अशोक मार्गावरील ओवैसी यांच्या घरावर काही अज्ञातांनी हल्ली केल्याचे वृत्त आहे. ओवैसी यांनी दिल्ली पोलिसांत याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची नोंद करुन घेत पोलीस ओवैसी यांच्या घरावरील हल्ल्याचे पुरावे गोळा करत आहेत. पोलिसांनी ओवैसी यांच्या घराजवळ व्हॅन उभी केली आहे.

संसद मार्ग पोलीस ठाण्यात ओवैसी यांनी ही तक्रार दिली आहे. या हल्ल्याबाबत ओवैसी म्हणाले, काही अज्ञातांच्या समूहाने घरावर दगडफेक केली. घराच्या खिडकीचे नुकसान केले. मी रात्री साडेअकराच्या सुमारास घरी गेलो. तेव्हा घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. घरात दगडांचा खच पडला होता. मला घरकाम करणाऱ्या नोकरांनी सांगितले की, साडेपाचच्या सुमारास हल्लेखोरांनी घरावर हल्ला केला. घराचे नुकसान केले.

ओवैसी यांनी तक्रार दिल्यानंतर दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या हल्ल्याचे पुरावे गोळा करत आहेत. हा हल्ला कोणी केला. या हल्ल्याचा मुख्यसुत्रधार कोण आहे. कोणाच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला याची चौकशी पोलीस करत आहेत. या हल्ल्याचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याची अधिक चौकशी करत आहेत.

माझ्या घरावर अशाप्रकारे चौथ्यांदा हल्ला करण्यात आला आहे. माझ्या घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांनी तत्काळ तपास करुन हल्लेखोरांना अटक करावी. अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ओवैसी यांनी केली आहे.

सप्टेंबर २०२१ मध्येही अशाच प्रकारे ओवैसी यांच्या घरावर हल्ला केला गेला होता.  दिल्लीतील शासकीय घराची काही जणांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली होती. या घटनेची जबाबदारी हिंदू सेनेने एक निवेदन जाहीर करत घेतली होती. यानंतर पोलिसांनी हिंदू सेनेच्या पाच जणांना ताब्यात घेतले होते.

हिंदूविरोधी वक्तव्यांमुळे संतप्त झालेल्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी ओवैसींच्या घराबाहेर जाऊन निदर्शने केली तसेच मोठ्याप्रमाणात तोडफोड केली. हिंदू सेनेचे कार्यकर्ते खासदार ओवैसींच्या अशोक रोडवरील बंगला क्रमांक ३४ वर पोहोचले होते. कार्यकर्त्यांनी ओवैसींविरोधात घोषणाबाजी करत तोडफोड सुरू केली होती.