International News : नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी भाविक, पर्यटकांची मोठीच गर्दी झाली आहे. देशविदेशातूनही पर्यटक, भाविक येथे कुंभमेळ्यासाठी आले आहेत. यातच एक विशेष गोष्ट समोर आली आहे. भारताचे शेजारी आणि शत्रू राष्ट्र पाकिस्तान देखील या महाकुंभ मेळ्याबाबत गूगलवरून माहिती घेत असल्याचे लक्षात आले आहे. उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या महाकुंभ मेळा, येथे येणारे वेगवेगळ्या पंथाचे साधू, पवित्र स्नान, अशा विविध गोष्टींमुळे मुसलमान देशांमध्ये देखील याबाबत मोठ्या प्रमाणात कुतूहल आहे. त्यामुळेच पाकिस्तान देखील महाकुंभाशी अनेक गोष्टींची माहिती गूगलवर सर्च करतो आहे. (pakistan canada and many other countries searching about mahakumbh)
यामुळेच महाकुंभ हा केवळ भारताचा नाही तर संपूर्ण जगाचा इव्हेंट झाला आहे. प्रयागराजमध्ये सोमवारी महाकुंभाचा शुभारंभ झाला. ब्राझील, जर्मनी, जपान, इंग्लंड, अमेरिका तसेच स्पेनसारख्या देशांमधून अनेक भाविक प्रयागराजला पोहोचले आहेत. यामुळे जगभरात सनातन संस्कृतीबद्दल आकर्षण वाढते आहे.
हेही वाचा – Vinod Tawde on Pawar : सावरकरांबद्दलही पवार हेच म्हणाले असते का, भाजप नेते विनोद तावडे यांचा सवाल
गूगल ट्रेंड्सनुसार, महाकुंभ 2025 बाबत मुसलमान देशांमध्ये खूपच उत्साह आहे. महाकुंभबाबत सर्च करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचे नाव सर्वात वरती आहे. पाकिस्तान नंतर कतार, यूएई आणि बहरीन सारखे देश देखील याबाबत माहिती घेत आहेत. याशिवाय नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, ब्रिटन, थायलंड तसेच अमेरिकेसारखे देश देखील महाकुंभ मेळ्याबाबत गूगलवर सर्च करत आहेत.
कुंभमेळ्यात संगमावर स्नान करण्याला फार महत्त्व दिले जाते. यावेळी तर जवळपास 3.5 कोटी भाविकांनी संक्रांतीच्या दिवशी कुंभमेळ्यातील पहिले स्नान केले. भाविकांची एवढी मोठी संख्या ही कुंभमेळ्याची लोकप्रियता तसेच भाविकांची श्रद्धा दर्शवते. याचे पहिले स्नान ही भाविकांसाठी एक पर्वणीच असते.
45 दिवस चालणाऱ्या या महाकुंभमेळ्यासाठी जवळपास 40 कोटींहून अधिक लोक येण्याची शक्यता आहे. या महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 7 हजार कोटी रुपयांचे बजेट दिले आहे. जवळपास 4 हजार हेक्टर जागेवर आयोजित करण्यात आलेल्या या महाकुंभमेळ्याचा समारोप 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणार आहे. या महाकुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशातील अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून त्यांना 2 लाख कोटींचा फायदा होईल. येथे एकत्र येणारे 40 कोटी लोक सरासरी 5 हजार रुपये खर्च करतील. यामुळे उत्तर प्रदेश सरकारचा फायदा होणार आहे.
हेही वाचा – Aaditya Thackeray : नेत्यांच्या दौऱ्यांसाठी मुंबईकरांना का वेठीला धरता, वाहतुकीतील बदलामुळे ठाकरे भडकले
देशाच्या GDP मध्येही होणार वाढ
या महाकुंभमेळ्यात प्रत्येक व्यक्ती सरासरी 10 हजार रुपये खर्च करण्याची शक्यता असल्याचे, एका वृत्तसंस्थेने या क्षेत्रातील जाणकारांच्या हवाल्याने म्हटले आहे. तसे झाल्यास 2 लाख कोटींची ही रक्कम जवळपास 4 लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे देशाच्या जीडीपीमध्ये देखील जवळपास 1 टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे.