नवी दिल्ली : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानची भारताबरोबर पंगा घेण्याची खोड जात नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानने वर्षभरानंतर पुन्हा जुना मुद्दा उपस्थित केला आहे. भारताकडून चुकून सोडण्यात आलेल्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रकरणाच्या संयुक्त चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानने पुन्हा एकदा केली आहे. वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनेबाबत भारताने ‘समाधानकारक प्रतिसाद’ द्यावा, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
राजस्थानमधील सुरतगड येथून 9 मार्च 2022 रोजी डागलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. वस्तुत:, याप्रकरणी भारताने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय हवाई दलातील संबंधित तीन अधिकाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. त्यांच्याकडून मानक ऑपरेटिंग प्रक्रियेमध्ये (SOP) त्रुटी राहिल्याने हे क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आल्याचे कोर्ट ऑफ इन्क्वायरी (COI) दरम्यान उघड झाले होते.
🔊: PR NO. 5️⃣4️⃣/2️⃣0️⃣2️⃣3️⃣
Pakistan reiterates its concern on India’s irresponsible firing of BrahMos supersonic missile into Pakistani territory on March 9, 2022
🔗⬇️https://t.co/e21Rxi25vT pic.twitter.com/f8Wx0cL58d
— Spokesperson 🇵🇰 MoFA (@ForeignOfficePk) March 10, 2023
या गंभीर घटनेमागचे नेमके कारण शोधून काढण्याच्या दृष्टीने संयुक्त तपासाची पाकिस्तानने केलेली मागणी एक वर्ष उलटून गेले तरी, भारताने मान्य केलेली नाही. तसेच भारताने आपल्या अंतर्गत तपासाचे निष्कर्ष देखील पाकिस्तानला दिलेले नाहीत, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारतातील सामरिक शस्त्रास्त्रांसाठी कमांड आणि कंट्रोल सिस्टमबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असल्याने भारताने कथित अंतर्गत तपास घाईघाईने बंद करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला, असा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
या बेजबाबदार प्रकाराची संयुक्त चौकशी करण्याच्या मागणीचा पाकिस्तान पुनरुच्चार करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. उभय देश आण्विकशक्ती असल्याने अशा वातावरणात क्षेपणास्त्रांच्या अचानक किंवा अनधिकृत प्रक्षेपणाविरूद्ध सुरक्षाविषयक प्रोटोकॉल आणि तांत्रिक सुरक्षेसंदर्भातील अनेक मूलभूत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आणि स्पष्टीकरणाची अपेक्षा आम्ही करतो, असे पाकिस्तानने म्हटले आहे. गेल्या वर्षीही या घटनेनंतर पाकिस्तानने उपस्थित केलेल्या प्रश्नांची भारत सरकारने सविस्तर उत्तरे द्यावी आणि संयुक्त चौकशीची मागणी मान्य करावी, अशी मागणी पाकिस्तानने केली होती.