Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा भारताबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान आतूर, शाहिद आफ्रिदी पंतप्रधान मोदींना घालणार साकडे

भारताबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान आतूर, शाहिद आफ्रिदी पंतप्रधान मोदींना घालणार साकडे

Subscribe

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012-13 पासून कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळलेली नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धा किंवा आशियाई क्रिकेट स्पर्धांमध्येच खेळताना दिसतात. हे दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने असतात तेव्हा स्टेडियममधील एकही जागा रिकामी राहत नाही. कारण भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध कोण जिंकणार असा विचार करून प्रेक्षक हा सामना पाहत असतात. मात्र, राजकीय कारणांमुळे दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाही आहे.

दोन्ही देशांदरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती आणि दोन्ही संघामध्ये शेवटचा सामना 2022 टी-20 विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता. मात्र आता दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध पूर्ववत होण्यासाठी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मोठे वक्तव्य केले आहे. आफ्रिदीने भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी द्यावी, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

- Advertisement -

दोहामध्ये लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) च्या निमित्ताने आफ्रिदी उपस्थित होता. यावेळी तो म्हणाला की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करेन की त्यांनी दोन देशांदरम्यान पुन्हा क्रिकेट सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी.’ यंदाचा आशिया चषक पाकिस्तामध्ये आयोजित करण्यात आला असून भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेचे आयोजन त्यांच्या देशात करण्याचा निर्धार केला आहे.

आफ्रिदीचे बीसीसीआयबद्दल वक्तव्य
आफ्रिदी म्हणाला की, जर आपल्याला एखाद्याशी मैत्री करायची असेल, परंतु तो आपल्याशी बोलत नसेल तर आपण काय करू शकतो? बीसीसीआय खूप मजबूत बोर्ड आहे यात शंका नाही, पण जेव्हा तुम्ही मजबूत असता तेव्हा तुमच्यावर अधिक जबाबदारी असते. तुम्ही आम्हाला शत्रू बनवण्याचा प्रयत्न करू नका, तर तुम्ही आम्हाला मित्र बनवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही जास्त मित्र बनवता तेव्हा तुम्ही मजबूत होतात.

- Advertisement -

आशिया चषक आयोजनाबद्दल काय म्हणाला आफ्रिदी?
आशिया चषकाला भारत नाही म्हणत आहे. जर भारताने आशिया चषकासाठी पाकिस्तानचा दौरा करण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तान भारतीय संघाची खूप काळजी घेईल. बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवल तर ते योग्य होईल. आम्ही त्यांना आमच्या डोक्यावर ठेवू. यापूर्वी मुंबईतील एका भारतीयाने पाकिस्तानला भारतात येऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती. पण आम्ही सगळे बाजूला ठेवले आणि आमच्या सरकारने जबाबदारी घेत पाकिस्तान संघाला भारतात पाठवले होते. त्यामुळे मी एवढेच म्हणेन की, धमक्यांनी आमचे संबंध बिघडू नयेत, नाहीतर धोके कायम राहतील.

- Advertisment -