नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. तर काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्यामुळे तिथे पुन्हा निवडणुका घेण्याचा निर्णय पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची जनता आणखीनच गोंधळली आहे. एकीकडे तिन्ही प्रमुख पक्षांनी एकमेकांशी चर्चेबाबत कोणताही पुढाकार घेतलेला नाही. दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षानं देशभर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
मदार अपक्षांवर?
पाकिस्तानच्या संसदेत एकूण 256 जागा आहेत. इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्साफ आणि मित्रपक्ष (92), नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज आणि मित्रपक्ष (71) तर बिलावल भुट्टोंचा पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि मित्रपक्ष (54) या तीन पक्षांमध्ये यातील बहुतांश जागा विभागल्या गेल्या आहेत. कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने आता अपक्षांच्या निर्णयावर पाकिस्तानमधील आगामी सरकार अवलंबून असणार आहे. विशेष म्हणजे यापैकी तिन्ही पक्षांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा – Bihar Floor Test: …तर बिहारमध्ये होऊ शकते मोठी खेळी; नितीश कुमारांचे फासे उलटे पडणार?
देशव्यापी आंदोलन छेडणार
पाकिस्तानमध्ये त्रिशंकू परिस्थिती दिसत असताना पाकिस्तानी लष्करानं या सगळ्यात पुढाकार घेतला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी नवाज शरीफ यांच्या सरकार स्थापनेच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. नवाज शरीफ यांनी सर्व लोकशाहीप्रिय पक्षांना एकत्र येत सरकार स्थापनेचं आवाहन केलं आहे. त्याला लष्करानं पाठिंबा दिल्यानंतर लष्करप्रमुखांच्या या कृतीवर इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षानं तीव्र आक्षेप घेतला आहे. इम्रान खान सध्या तुरुंगात असून त्यांच्या पक्षाकडून देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे. 12 फेब्रुवारी रोजी हे आंदोलन होईल.
52 मतदान केंद्रांवर पुनर्मोजणी
अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नसताना एकूण 52 मतदान केंद्रांवरील मतमोजणी पुन्हा करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एनए-88 आणि पीके-90 या भागांमधील अनुक्रमे 26 आणि 25 मतदान केंद्रांवर पुनर्मोजणी केली जाणार आहे. याशिवाय पीएस-18 येथील एका मतदान केंद्रावरही पुनर्मोजणी होईल. काही ठिकाणी निवडणूक सामग्रीची जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. निवडणूक साहित्याचं नुकसान झाल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – Prime Minister : मोदींशिवाय पंतप्रधान पदासाठी ‘या’ नेत्यांना आहे पसंती
चर्चेला पुढाकार घेणार कोण?
बिलावल अली भुट्टो यांनी आपल्याशी नवाज शरीफ किंवा इम्रान खान या कुणाकडूनही चर्चेसाठी बोलणी करण्यात आली नसल्याचं जाहीर केलं आहे. असं असलं तरी नवाज शरीफ गटाकडून भुट्टोंशी आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचे दावे केले जात आहेत. पक्ष म्हणून इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-पाकिस्तानला आत्तापर्यंत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र, सरकार स्थापनेसाठी त्या पुरेशा नसल्यामुळे मित्रपक्ष व प्रलंबित मतमोजणीच्या जागा यावर इम्रान खान यांची भिस्त असेल.