पाकिस्तानात आणखी एक बॉम्बस्फोट; बाजूलाच खेळत होते दोन खेळाडू

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा शहरात रविवारी आणखी एक बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बॉम्बस्फोटात पाच जण जखमी झाले आहेत. क्वेटा पोलिस लाइन्स परिसरात हा स्फोट झाला.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा शहरात रविवारी आणखी एक बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बॉम्बस्फोटात पाच जण जखमी झाले आहेत. क्वेटा पोलिस लाइन्स परिसरात हा स्फोट झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. (Pakistan five injured in explosion in Pakistan Quetta city ttp takes the responsibility)

या बॉम्बस्फोटातील जखमींना, पोलिस कर्मचाऱ्यांना शहरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी बॉम्बस्फोट झालेल्या घटनास्थळाभोवतीच्या सुरक्षेत वाढ केली. प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे टीटीपीने स्फोटानंतर सांगितले.

या बॉम्बस्फोटानंतर क्वेटाच्या नवाब अकबर बुगती स्टेडियमवर खेळला जाणारा पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) सामनाही रद्द करण्यात आली. या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीसारखे हाय-प्रोफाइल खेळाडू सहभागी होत आहेत. दरम्यान, कोणताही खेळाडू जखमी झाला नसल्याची प्राथमिक माहिती मिळते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पेशावरमधील एका मशिदीत दुपारच्या प्रार्थनेदरम्यान एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवले होते. या घटनेत 101 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 200 जण जखमी झाले.

अलीकडच्या काळात, पाकिस्तानला अनेक दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे, ज्यापैकी बहुतेक देशाच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात घडले. यासोबतच बलुचिस्तान आणि पंजाबच्या सीमेला लागून असलेल्या मियांवली शहरातही हल्ले झाले आहेत.

एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्रानुसार, शुक्रवारी सर्वोच्च समितीच्या बैठकीत, पाकिस्तानच्या नेतृत्वाने टीटीपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अफगाण तालिबान प्रमुख हैबुतल्ला अखुंदजादा यांचा हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा – केंद्र सरकारकडून ‘त्या’ 232 मोबाईल अॅप्सविरोधात मोठी कारवाई, चीनसह अन्य देशांना फटका