पाकिस्तानने आळवला शांततेचा सूर, काश्मीर मुद्द्यावर पुन्हा रडगाणे

संयुक्त राष्ट्रे : भारतासह आम्हाला सर्व शेजारील राष्ट्रांबरोबर शांततापूर्ण संबंध हवे आहेत. आपण एकमेकांशी जोडले गेलो आहेत, ही बाब लक्षात भारतानेही घेतली पाहिजे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

भारताने 5 ऑगस्ट 2019 रोजी एकतर्फी आणि मनमानीपणे अनुच्छेद 370 हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणला. परिणामी शांततेची शक्यता धूसर झाली आणि क्षेत्रातील तणाव वाढला, असे सांगतानाच भारताबरोबर युद्ध हा काही पर्याय नाही, असेही शरीफ म्हणाले. अशा प्रकारे काश्मीरबद्दलची पाकिस्तानची खदखद पुन्हा एकदा बाहेर आली.

आपल्या शेजारील राष्ट्रांबरोबर पाकिस्तानला स्थिर वातावरण पाहिजे. आम्हाला सर्व शेजाऱ्यांबरोबर शांततापूर्ण संबंध हवे आहेत. वस्तुत:, दक्षिण आशियात कायमस्वरुपी शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करायची असेल तर, जम्मू-काश्मीर समस्येचे न्याय्य पद्धतीने निराकारण करणे गरजेचे आहे. दोन्ही देश शस्त्रसज्ज आहे. केवळ शांततापूर्ण मार्गानेच हे प्रश्न सोडवता येऊ शकतात. हे भारताने लक्षात घेतले पाहिजे. सकारात्मक स्थिती राखण्यासाठी भारताने पावले उचलायला हवीत. आपण शेजारी आहोत. शांतता हवी की संघर्ष याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, असे शरीफ यांनी सांगितले.

सन 1947नंतर आमच्यात तीन युद्ध झाली. त्यामुळे दोन्ही बाजूने फक्त दु:ख, गरीबी आणि बेरोजगारी वाढली आहे. आता आपापसातील मतभेद, आपल्यातील प्रश्न आणि आपल्यातील वादग्रस्त मुद्द्यांवर शांततेपूर्ण चर्चतून मार्ग काढता येऊ शकतो, असेही ते म्हणाले. उभय देशांनी आपले धन शस्त्रास्त्र खरेदीत वाया घालवू नये, असा अनावश्यक सल्लाही त्यांनी दिला.

काश्मीरमध्ये सैन्यात वाढ
भारताने जम्ंमू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. त्यामुळे सर्वाधिक सैन्य असलेला हे जगातील भूभाग बनला आहे, असा आरोप शहबाज शरीफ यांनी केला. पाकिस्तान हा कायमच काश्मिरींच्या पाठीशी उभा राहिला आहे, असा दावाही त्यांनी केला.