लाहोर : तोशखाना प्रकरणी (Toshakhana case) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेवरून मंगळवारी (14 मार्च) पाकिस्तानमध्ये सुरू झालेला गोंधळ बुधवारी सकाळपर्यंत सुरूच होता. लाहोरमध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (PTI) अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना अटक करण्यासाठी त्यांच्या जमान पार्क (Zaman Park) येथील निवासस्थानी अधिक पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस तिथे पोहोचलेले असले तरी, समर्थक आक्रमक झाल्याने अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून इम्रान खान यांची अटक रोखण्यासाठी त्यांचे समर्थक जमान पार्क येथे मोठ्या प्रमाणावर जमा झाले. मंगळवारी पोलीस तिथे दाखल होताच, या समर्थकांची पोलिसांशी झटापट झाली. जवळपास 14 तास चाललेल्या या चकमकीत पीटीआयचे 15 कार्यकर्ते आणि 30 पोलीस जखमी झाल्याचे जिओ न्यूजने म्हटले आहे. तथापि, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांची प्रदीर्घ कारवाई असूनही, पीटीआय कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिकारामुळे पोलीस त्यांना अद्याप अटक करू शकलेले नाहीत.
ملک بھر میں، زمان پارک میں غیر قانونی کاروائی کیخلاف عوام کی جانب سے بھرپور احتجاج۔ #زمان_پارک_پُہنچو pic.twitter.com/oh0FeDc1pN
— PTI (@PTIofficial) March 14, 2023
पोलिसांनी पीटीआयच्या अनेक कार्यकर्त्यांना अटकही केली आहे. जमन पार्क हे युद्धभूमी बनले आहे. एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, पीटीआय कार्यकर्ते आणि समर्थकांनी लाहोरमधील जमान पार्कचा ताबा घेतला आहे. पीटीआय कार्यकर्त्यांनी इम्रान खान यांच्या निवासस्थानाबरोबरच तसेच कॅनॉल रोडकडे जाणारा मार्गही रोखला आहे. पीटीआय कार्यकर्ते आणि समर्थकांनी इम्रान खान यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्याचबरोबर देशभरातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत.
तोशखाना प्रकरणात इम्रान खानविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाल्यानंतर एका दिवसानंतर पोलीस त्याच्या घरी पोहोचले. इम्रान खान यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही इम्रान खान यांचे समर्थक निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने जमले आहेत. पोलिसांच्या कारवाईचा विरोध करणाऱ्या या समर्थकांवर पाण्याचा मारा करण्यात आला.
या आक्रमक समर्थक आणि पीटीआय कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेकीत इस्लामाबादचे उपमहानिरीक्षक (ऑपरेशन्स) शहजाद बुखारी हे जखमी झाले.
यापूर्वी, एका जाहीर सभेत महिला दंडाधिकाऱ्याला धमकावल्याबद्दल इम्रान खान यांच्याविरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटला इस्लामाबादच्या एका न्यायालयाने मंगळवारी 16 मार्चपर्यंत स्थगिती दिली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश झेबा चौधरी आणि इस्लामाबाद पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध धमकीची भाषा वापरल्याबद्दल सोमवारी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.