पाकिस्तानने विकायला काढली अमेरिकेतील दूतावासाची इमारत? बोली लावणाऱ्या तिघांत एक भारतीय!

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे आर्थिक संकट दिवसेंदिवस गहिरे होत चालले आहे. परिणामी पाकिस्तानने थेट अमेरिकेतील आपल्या दूतावासाची इमारतच विकायला काढली आहे. या दूतावासाच्या या इमारतीत एकेकाळी संरक्षण विभाग होता आणि त्याच्या खरेदीसाठी आतापर्यंत तीन बोली लागल्या असून त्यात एक भारतीयाचा समावेश आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अलीकडेच अमेरिकेतील पाक दूतावासाची मालमत्ता विकण्यास मंजुरी दिली आहे. ही इमारत अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनच्या पॉश भागात आहे आणि या दूतावासाच्या संरक्षण विभागाची  किंमत सुमारे 6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. या इमारतीच्या खरेदीसाठी बोली लागण्यास सुरुवात झाली आहे. या इमारतीसाठी आतापर्यंत तीन निविदा आल्या आहेत. एका ज्यू समुदायाने सर्वाधिक बोली लावली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च बोली भारतीय रिअल्टरची आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. ज्या इमारतीत एकेकाळी पाकिस्तानच्या दूतावासाचा संरक्षण विभाग होता, त्यासाठी ज्यू समुदायाने सर्वाधिक बोली लावली आहे. सुमारे 6.8 दशलक्ष डॉलरची (56.33 कोटी रुपये) बोली ज्यू समुदायाने लावली असून इमारतीत प्रार्थनास्थळ बांधण्याचा मानस या समुदायाचा आहे, असे पाकिस्तानी राजनैतिक सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – महाराष्ट्रात ठराव मंजूर झाल्यावर बोम्मई पुन्हा बरळले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

एका भारतीय रिअल इस्टेट एजंटने 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची (41.38 कोटी रुपये) दुसऱ्या क्रमांकाची बोली देखील लावली आहे. तर एका पाकिस्तानी रिअल इस्टेट एजंटने 4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची (33.18 कोटी रुपये) बोली लावली आहे. पाकिस्तानी-अमेरिकन रिअल इस्टेट एजंट्सच्या मते, ही इमारत सर्वाधिक बोली लावणाऱ्याला विकली जावी, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

या महिन्याच्या सुरुवातीला, पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वॉशिंग्टनमधील पाकिस्तानच्या तीन राजनैतिक मालमत्ता आहेत, ज्यात आर स्ट्रीट एनड्ब्ल्यूवर एक इमारत असून ती विकण्यात येणार आहे. 1950 ते 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत पाकिस्तान दूतावासाचा संरक्षण विभाग या इमारतीत कार्यरत होता. तथापि, नवीन किंवा जुने दूतावास विकले जात नसल्याचे देखील पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – रश्मी शुक्लांची फाइल पुन्हा उघडली, फोन टॅपिंगप्रकरणी नव्याने चौकशी होणार