इस्लामाबाद: तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेबाबत संयुक्त राष्ट्राचा अहवाल समोर आला आहे. बंदी घातलेली दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला (TTP) तालिबानचा पाठिंबा असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. (Pakistan Taliban behind terrorist organization TTP in Pakistan Disclosure from the United Nations)
पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी टीटीपीला अल कायदा आणि इतर दहशतवादी गटांकडूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला अहवाल सादर
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सादर करण्यात आलेल्या 33व्या अहवालात ही माहिती उघड करण्यात आल्याचे डॉन न्यूजने म्हटले आहे. या अहवालात टीटीपीला सहकार्य म्हणून शस्त्रे आणि इतर आवश्यक उपकरणे पुरवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्याचा वापर पाकिस्तानमधील हल्ल्यांमध्ये होतो.
तालिबानचे सदस्य टीटीपीमध्ये सामील
अहवालात म्हटले आहे की, तालिबानची भूमिका असूनही, टीटीपीचे सैनिक पाकिस्तानमध्ये हल्ले करण्यात गुंतलेले आहेत. याशिवाय तालिबानचे काही सदस्य त्यांच्या कारवायांपासून प्रेरित होऊन टीटीपीमध्ये सामील झाले आहेत.
पाकिस्तान टीटीपीला देशाच्या सुरक्षेसाठी धोका
देशात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत पाकिस्तान सरकारने तालिबानकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. तालिबानला टीटीपीच्या कारवाया रोखण्यात अपयश आल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तान टीटीपीला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका मानतो.
टीटीपीने खैबर पख्तूनख्वाला बनवला अड्डा
UNSC अहवालानुसार, TTP ने 2023 च्या मध्यापर्यंत खैबर पख्तुनख्वामध्ये आपला मोठा तळ तयार केला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय आत्मघाती हल्लेखोरही तयार करण्यात आले आहेत. हे आत्मघाती हल्लेखोर कुठेही बॉम्ब बांधून स्फोट करतात. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे वचन दिले जाते आणि त्यासाठी अफगाण तालिबान आणि अल कायदाकडून निधी दिला जातो.