भारताचा गहू थेट अफगाणिस्तानात व्हाया पाकिस्तान, इमरान खान सरकारची परवानगी

Pakistan to allow India to send wheat to Afghanistan through its territory announced Imran Khan
भारताचा गहू थेट अफगाणिस्तानात व्हाया पाकिस्तान, इमरान खान सरकारची परवानगी

पाकिस्तानच्या इमरान खान सरकारने भारतीय गहू काबूलमध्ये पोहचवण्यासाठी रस्ता देण्यास परवानगी दिली आहे. यामुळे भारतातून आता ५० हजार टन गहू पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानात पोहणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केली आहे. हा निर्णय मानवतावादी आधारावर घेण्यात आला असून भारत सरकार यासंदर्भात संबंधित प्रक्रिया पूर्ण करणार आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी वेगाने केली जाईल.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले की, विविध आजारांवरील उपचारांसाठी भारतात गेलेल्या अफगाणी नागरिकांनाही पाकिस्तानातून रस्ते मार्गे अफगाणिस्तानात जाण्यासाठी मदत केली जाईल. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्याने हवाई मार्गे अनेक अफगाणी नागरिक भारतात दाखल झाले. हे नागरिक अद्यापही भारतात राहत आहेत. पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयातून सोमवारी जाहीर झालेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही काळात भारताने सांगितले होते की, अफगाणिस्तानला मानवतावादी आधारावर गहू पाठवायचे आहेत.

मात्र पाकिस्तानच्या आडमूठे धोरणामुळे गेली अनेक वर्षे भारत अफगाणिस्तानला आवश्यक गहू पाठवू शकला नाही. मात्र नंतर चाबहार बंदराची स्थापना झाल्यानंतर या देशाला गहू पाठवणे शक्य झाले होते. अशातच अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आल्याने चाबहार बंदरावरून अफगाणिस्तानला गहू पाठवणे अधिक अवघड झाले. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेदरम्यान मानवतावादी आधारावर अफगाणिस्तानला तात्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत म्हटले की, अफगाणिस्तानातील लोकांना आवश्यक मदत पुरवण्यासाठी इतर भागधारकांशी समन्वय साधण्यास ते तयार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी बुधवारी अफगाणिस्तानमधील यूएन सहाय्यता मिशनमध्ये यूएनएससीला संबोधित करताना, अफगाणिस्तानच्या मानवतावादी मदतीसाठी अडचणी येऊ नये यासाठी समर्थन केले.