Champions Trophy 2025 : कराची : आपल्या विघातक कामांमुळे कायमच जगभरात चर्चेत असलेला देश म्हणजे पाकिस्तान. अशा या पाकिस्तानला जवळपास 25 ते 30 वर्षांनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळाली. मात्र, या संधीचे सोने करण्याची संधी पाकिस्तान गमावताना दिसतो आहे. आपल्या खराब कामगिरीमुळे आधीच स्पर्धेतून बाहेर गेलेल्या पाकिस्तान संदर्भात आता अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील पोलिसांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान सोपवण्यात आलेली सुरक्षेची जबाबदारी नाकारली आहे. याप्रकरणी पंजाब पोलीस दलातील 100 हून अधिक पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. (pakistani policemen do not want to do duty in champions trophy more than 100 suspended)
आयसीसी स्पर्धेच्या आयोजनाची संधी तर मिळाली पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोरील आव्हाने काही संपताना दिसत नाहीत. आधी भारतीय क्रिकेट संघाचा विरोध, मग सुरक्षेचा प्रश्न, त्यानंतर मैदानांची दुरवस्था अशा अनंत अडचणींवर मात करून शेवटी पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन तर केलं पण आता पीसीबीसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील पोलिसांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान सोपवण्यात आलेली सुरक्षेची जबाबदारी नाकारली. त्यामुळे पंजाब पोलीस दलातील 100 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
हेही वाचा – CBSE Board : सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी वर्षातून दोन वेळा देणार दहावीची परीक्षा, नेमकं प्रकरण काय –
पंजाब पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान अनेकदा काही पोलीस आपल्या कामावर हजर राहिले नाहीत. अशा बेजबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर, काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममधून हॉटेल्सकडे जाताना वेगवेगळ्या संघांना सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, तेथेही अनेकजण गैरहजर राहिले. तर, काहींनी ही जबाबदारी घेण्यास थेट नकार दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की पंजाबचे पोलीस महानिरीक्षक उस्मान अन्वर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित पोलिसांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धा हा सुरक्षेचा अत्यंत संवेदनशील प्रश्न असताना तेथे निष्काळजीपणाला कोणतीही जागा नाही, असे अन्वर यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
पोलीस का गैरहजर राहिले?
दरम्यान, या कारवाईबाबत कोणत्याही प्रकारचं अधिकृत वक्तव्य अथवा निवेदन समोर आलेलं नाही. त्याचबरोबर बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावण्यास नकार का दिला हे देखील समजलेलं नाही. पाकिस्तानमधील काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पोलीस कित्येक महिन्यांपासून सेवा देत आहेत. तसेच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान त्यांचे कामाचे तासही वाढले आहेत. त्यांच्यावरील ताण वाढला आहे. अनेकांना आठवड्याच्या रजा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
हेही वाचा – Champions Trophy 2025 : माकडेही एवढी केळी खात नाहीत, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची संघावर टीका