घर देश-विदेश बड्या नेत्यांवरील हल्ल्यांचा पाकिस्तानचा रक्तरंजित इतिहास, त्यामागे नेमके कोण?

बड्या नेत्यांवरील हल्ल्यांचा पाकिस्तानचा रक्तरंजित इतिहास, त्यामागे नेमके कोण?

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तान तेहरिक ए इन्साफच्या गुरुवारी निघालेल्या रॅलीत गोळीबार झाला आणि त्यात माजी पंतप्रधान इम्रान खान जखमी झाले. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. पण पाकिस्तानातील बड्या राजकीय नेत्यांवरील हल्ल्याचा रक्तरंजित इतिहास फार जुना आहे. यामागे नक्की कोण असू शकते, याचाही अंदाज सर्वसामान्यांना आहे.

गुजराँवाला येथील रॅलीत इम्रान खान सहभागी झाले होते. रॅलीत अचानक हल्लेखोर घुसला आणि त्याने जवळपास सहा ते सात राऊंड फायर केले. यामुळे पाचजण जखमी झाले तर, इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

पाकिस्ताननिर्मितीनंतर चार वर्षांतच पहिली हत्या
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची 16 ऑक्टोबर 1951 रोजी रावळपिंडी येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ते एका सभेला संबोधित करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही कथित मारेकऱ्याला तत्काळ गोळ्या घातल्या.

पश्चिम पाकिस्तानचे मुख्यमंत्री हल्लेखोरांच्या रडारवर
पश्चिम पाकिस्तानचे मुख्यमंत्री खान अब्दुल जब्बार खान यांची 9 मे 1958 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. खान यांचा मुलगा सदुल्लाह खान याच्या लाहोरमधील घराच्या बागेत बसले असताना ही घटना घडली. अता मोहम्मद असे हल्लेखोराचे नाव होते.

- Advertisement -

चकमकीत मीर मुर्तझा भुत्तो ठार
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांचा मोठा मुलगा मीर मुर्तझा भुत्तो यांची कराचीमध्ये 20 सप्टेंबर 1996 रोजी हत्या करण्यात आली होती. भुत्तो हे त्यांच्या सहा कार्यकर्त्यांसह पोलीस चकमकीत मारले गेले.

रॅलीतच बेनझीर भुत्तोंची हत्या
पाकिस्तानचे पंतप्रधानपद दोनवेळा भूषविणाऱ्या बेनझीर भुत्तो यांची 27 डिसेंबर 2007 रोजी रावळपिंडीच्या लियाकत बाग येथे गोळीबार आणि आत्मघाती बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली होती. विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणून प्रचार करत असताना त्यांची हत्या झाली. राजकीय रॅलीनंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर लगेचच आत्मघाती बॉम्बस्फोट झाला.

मुशर्रफ यांच्यावर हल्ले
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर 2003मध्ये दोन हल्ले झाले होते. मात्र, दोन्ही हल्ल्यात ते बचावले. पहिला हल्ला रावळपिंडीत झाला. तेव्हा ते आपल्या ताफ्यासह येथील पुलावरून जात असताना बॉम्बचा स्फोट झाला. मात्र, त्यातून मुशर्रफ बचावले. नंतर त्याचवर्षी 25 डिसेंबर रोजी त्यांना ठार मारण्याचा आणखी एक प्रयत्न झाला, ज्यामध्ये मुशर्रफ थोडक्यात बचावले. यानंतर 2007मध्ये त्यांच्या विमानावर मशीनगनच्या 30हून अधिक फैरी झाडण्यात आल्या. या हल्ल्यातूनही ते बचावले.

एहसान इक्बाल यांच्यावर गोळीबार
पाकिस्तानचे माजी गृहमंत्री एहसान इक्बाल यांच्यावर 6 मे 2018 रोजी हल्ला झाला होता. त्यांच्यावर झालेल्या गोळीबार ते गंभीर जखमी झाले. सुरुवातीला त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण नंतर पंजाबची राजधानी असलेल्या लाहोरला त्यांना विमानाने नेण्यात आले.

कोणाच्या आशीर्वादाने हल्ले?
पाकिस्तानात कायमच सैन्याचा वरचष्मा राहिला आहे. लोकशाहीचा अवलंब करत पंतप्रधानपदी कोणतीही व्यक्ती निवडून गेली तरी, सत्तेची सारी सूत्रे तेथील सैन्याच्या हाती असतात. पंतप्रधान हा केवळ नामधारी असतो, असे सांगण्यात येते. अलीकडेच इम्रान खान यांनी दोन-तीन वेळा सैन्यांवर कडाडून टीका केली होती. त्याबद्दल त्यांनी नंतर सारवासारव देखील केली होती. पण आता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -