घरदेश-विदेशPakistan : देशाची वाटचाल विनाशाकडे..., इम्रान खान यांचा इशारा

Pakistan : देशाची वाटचाल विनाशाकडे…, इम्रान खान यांचा इशारा

Subscribe

इस्लामाबाद : पाकिस्तानची (Pakistan) वाटचाल विनाशाकडे सुरू असून पूर्व पाकिस्तानसारखी (सध्याचा बांगलादेश) परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते, असा इशारा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (former Prime Minister Imran Khan) यांनी दिला आहे. सत्ताधारी आघाडी आपल्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) या पक्षाविरोधात कट रचत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

- Advertisement -

यापूर्वी, इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्याविरोधात आता लष्कर आणि पोलीस प्रशासन कारवाई करत असून मोठ्या प्रमाणात पीटीआय कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी बुधवारी लाहोरमधील झमान पार्क येथील त्यांच्या निवासस्थानावरून एक व्हिडीओ जारी केला. देश विनाशाकडे जात आहे, अशी भीतीदायक स्वप्ने मला पडत आहेत. निवडणुका घ्या आणि देश वाचवा, असे आवाहन मी सत्ताधाऱ्यांना करतो. देशात जे गोंधळाचे वातावरण आहे तसेच राजकीय अस्थिरता आहे, त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे निवडणुका व्हाव्यात, असे इम्रान खान यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

पीडीएमचे (पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट) नेते आणि लंडनमध्ये वास्तव्यास असलेले नवाझ शरीफ यांना राज्यघटनेचा अवमान, सरकारी संस्थांचे उद्ध्वस्त होणे आणि पाकिस्तानी लष्कराची बदनामी याची पर्वा नाही. ते फक्त आपला फायदा बघत आहे आणि लुटलेली संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

- Advertisement -

संवेदनशीलतेने विचार करा, अन्यथा…
ही वेळ परीक्षेची आहे, सत्तेत बसलेल्यांनी संवेदनशीलतेने विचार केला पाहिजे, अन्यथा देशात पुन्हा एकदा पूर्व पाकिस्तानसारखी परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा इम्रान खान यांनी दिला आहे. बांगलादेश हा आधी पाकिस्तानचाच भाग होता आणि तो पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला आत असे. पूर्व पाकिस्तानातील नागरिकांना पश्चिम पाकिस्तानी राजवटीविरुद्ध संताप होता आणि मुजीबूर रहमान यांनी त्या रागाचे क्रांतीत रूपांतर केले. यानंतर 1971च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि पूर्व पाकिस्तान पाकिस्तानपासून वेगळे होऊन बांगलादेश बनला.
घरात दहशतवादी असल्याचा इन्कार
इम्रान खान यांच्या लाहोर येथील घराला सैन्य तसेच पोलिसांनी घेराव घातला आहे. त्यांच्या घरात दहशतवादी लपल्याची दावा सरकारने केला आहे. यावर इम्रान खान यांनी सांगितले की, आपल्या घरावर छापा टाकण्यासाठी हा कट रचला जात आहे. सरकारने सर्च वॉरंट आणून कायदेशीर मार्गाने त्याच्या घराची झडती घेतली पाहिजे. माझ्या घरात दहशतवादी लपले असतील, तर त्यांच्यापासून आपल्याच जीवाला धोका आहे, असे ते म्हणाले. इम्रान खान यांनी मीडियाच्या प्रतिनिधींना बोलावून आपले घर दाखवले. त्यानंतर प्रसार माध्यमांनी इम्रान खान यांच्या घरात दहशतवादी नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -