Budget Session 2025 : नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष घालत असलेल्या गोंधळामुळे सोमवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला चांगलेच संतापले. जनतेने तुम्हाला इथे बाकं तोडायला पाठवलेलं नाही तर त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवलं आहे, असा दमही दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच, विरोधकांनी महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. (parliament budget session 2025 speaker om birla angry over opposition mp uproar over mahakumbh stampede)
प्रश्नोत्तराच्या तासात घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात याचा उल्लेख केला होता. अभिभाषणावरील चर्चेदरम्यान तुम्ही यावर बोलू शकता. प्रश्नोत्तराचा तास महत्त्वाचा असतो. यात सरकार उत्तरे द्यायाला बांधील असते. तरीही विरोधकांनी त्यांचे न ऐकता त्यांच्या जवळ जाऊन घोषणा द्यायला लागले, तेव्हा लोकसभाध्यक्ष भडकले आणि म्हणाले की, तुम्हाला जनतेने टेबल तोडायला इथे पाठवलेले नाही, तर प्रश्न विचारायला पाठवले आहे.
आणि जर जनतेने तुम्हाला टेबल तोडण्यासाठीच पाठवले असेल, तर आणखी जोरात मारा. याबरोबरच, लोकसभाध्यक्षांनी विरोधकांना लोकसभेचे कामकाज चालू ठेवण्याची विनंती केली. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षातील सदस्यांना सांगितले की, तुम्ही ज्या विषयांवर चर्चा करू इच्छिता, त्या विषयांवर राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान चर्चा होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला संधी आणि वेळही दिला जाईल, असेही ते म्हणाले.
प्रश्नोत्तराचा तास हा जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, आणि तो स्थगित होता कामा नये. ही सर्व सदस्यांची सामूहिक जबाबदारी आहे. याव्यतिरिक्त अन्य मुद्दे हे प्रश्नोत्तराच्या तासानंतर बोलले गेले पाहिजेत. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना ते म्हणाले की, प्रश्नोत्तराचा तास कधीही स्थगित होऊ नये यासाठी आपण संकल्प करायला हवा, असा माझा आग्रह आहे. पण, जर तुम्ही केवळ घोषणाबाजी करायला आला असाल, नियोजनबद्ध रितीने संसदेचे कामकाज ठप्प करण्याचा तुमचा विचार असेल, बाकं वाजवायची असतील तर मी काहीही करू शकत नाही. मी केवळ विनंतीच करू शकतो, असेही बिर्ला म्हणाले.
#WATCH। माननीय सदस्यगण मैं आपसे आग्रह करना चाहता हूं कि जिन मुद्दों को आप उठाना चाहतें हैं, राष्ट्रपति अभिभाषण में आप उन सारे मुद्दों और विषयों को उठा सकते हैं। मैं आप सबको पर्याप्त समय और अवसर दूंगा । @ombirlakota #BudgetSession2025 #LokSabha @loksabhaspeaker @LokSabhaSectt pic.twitter.com/jXzmM84hjs
— SansadTV (@sansad_tv) February 3, 2025
देशातील जनतेने तुम्हाला घोषणाबाजी करण्यासाठी पाठवले असेल तर तुम्ही तेच कम करा. जर सभागृहाचे कामकाज चालावे असे वाटत असेल तर आपल्या जागेवर जाऊन बसा. कामकाज सुरू होताच, विरोधकांनी पंतप्रधान उत्तर द्या, आणि मोदी – योगी शेम शेम, अशा घोषणा दिल्या. मौनी अमावास्येच्या दिवशी महाकुंभात चेंगराचेंगरी झाली. यात जवळपास 30 लोकांचा मृत्यू झाला. मात्र, सरकार मृतांचा आकडा लपवत असल्याचा कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाचा आरोप आहे.