नवी दिल्ली: केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे (Parliament Special Session) 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसंदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यामध्ये 10 हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत. मात्र ही विधेयकं नेमकी कुठली आहेत? ते काही वेळातच कळणार आहे. दरम्यान, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत G20 शिखर परिषदेच्या काही दिवसांनंतर हे विशेष अधिवेशन होणार आहे. या काळात केंद्र सरकारच्या सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, सचिवांना आणि कॅबिनेट सचिवांना दिल्लीतच राहण्याचे निर्देश दिले आहेत. कुठल्याही विभागाचा सचिव पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगीशिवाय दिल्लीच्या बाहेर जाणार नाही, यासाठी सूचना जारी केल्या आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात 5 बैठका होतील. या काळात कुठलेही बडे अधिकारी अथवा विभागाचे सचिव दिल्लीबाहेर जाणार नाहीत याची खरबदारी सरकारने घेतली आहे. मात्र, सरकारने यामागचं कारण अद्याप सांगितलं नाही. (Parliament Special Session Do not leave Delhi during the Special Session Order to all Central Officers Secretaries)
10 हून अधिक विधेयकं मांडली जाणार?
समोर आलेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात 10 हून अधिक महत्त्वाची विधेयकं माडंली जाणार आहेत. विधेयकांमुळे विशेष अधिवेशन बोलावण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Parliament) 20 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत चाललं होतं. यादरम्यान मणिपूरमधील हिंसाचारावर दोन्ही सभाहात प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारसंदर्भात उत्तर द्यावं यासाठी विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता.
याआधी देशात जीएसटी लागू करण्यात आलं होतं
याआधी देशात जीएसटी लागू करण्यासाठी जून 2017 मध्ये मध्यरात्री लोकसभा, राज्यसभेचे संयुक्त अधिवेशन बोलावले होते. मिळालेल्या माहितीनुसार, संसदेचे हे विशेष अधिवेशन नवीन संसद भवनात होऊ शकते. ज्याचं उद्घाटन मोदींनी 28 मे रोजी केले होते. सामान्यपणे संसदेचे 3 अधिवेशन असतात. त्यात अर्थसंकल्पीय, पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनाचा समावेश आहे. विशेष परिस्थितीत संसदेला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. लोकसभा निवडणुका पाहता मोदी सरकार या विशेष अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयक आणणार आहे. त्यात वन नेशन वन इलेक्शन यासारखी मोठी घोषणा होऊ शकते.
(हेही वाचा: निवडणुकीपूर्वीच अशी वक्तव्ये का? मुंबईच्या मुद्द्यावरून उदय सामंतांचा विरोधकांवर आरोप )