देशभक्ती आमच्या नसानसांत भिनलेली – धर्मेंद्र

'देशभक्ती आमच्या नसानसांत भिनलेली', असं धर्मेंद्र म्हणाले आहेत. त्यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Dharmendra
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र

देशभक्ती आमच्या नसानसांत भिनलेली आहे, असं ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनी म्हटलं आहे. राज्यातील १७ जागांवर लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. यामध्ये मुंबईचा देखील समावेश होतो. त्यामुळे मुंबईतील संपूर्ण सहा मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान पार पडलं. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या सिनेसृष्टीच्या सर्व कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनी देखील मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मतदान केंद्रावर ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी म्हटलं आहे की, ‘राजकारणातलं आपल्याला काही कळत नाही. मात्र, आमच्या नसानसांत देशभक्ती भिनत आहे.’

‘आम्ही देशाची सेवा करु’

धर्मेंद्र म्हणाले की, ‘आमच्या नसानसांत देशभक्ती भिनलेली आहे. आम्ही देशाची सेवा करु. मी बिकानेर येथे काय काम केलं आहे, ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकतात. त्याचबरोबर सनी देखील देशाची सेवा करणार’. धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल यांनी गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपकडून गुरुदासपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. देओल कुटुंबियांची भाजप पक्षासी बांधिलकी आहे. धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी देखील २०१४ साली भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्या सध्या खासदार आहेत. याशिवाय धर्मेंद्र देखील बिकानेर मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत.