घरदेश-विदेशPegasus : ...तर भाजपने देशात तांडव केला असता; संजय राऊतांचा हल्लाबोल

Pegasus : …तर भाजपने देशात तांडव केला असता; संजय राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

केंद्रात काँग्रेस किंवा अन्य पक्षाचं सरकार असतं आणि पेगासस सारखं प्रकरण घडलं असतं तर भाजपने देशात तांडव केला असता असा घणाघात शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. तसंच, भाजपने आम्हाला लोकशाहीला धोका आहे वगैरे शिकवू नये, आम्हाला माहिती आहे की लोकशाहीला नाही तर संपूर्ण देशाला धोका आहे, अशी टीका देखील केली. इस्त्रायली पेगासस स्पायवेअरचा वापर करुन देशातील अनेक पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा धक्कादायक खुलासा काही ‘द वायर’सह जगभरातील अनेक मीडिया संस्थांनी केला आहे. याचे पडसाद आता संसदेच्या पावसाळी अधिवेशानात उमटत आहेत.

पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्याआधी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. “सरकारचा काय खुलासा असेल तर तो येईल, त्या खुलाशाला काही अर्थ नाही. जर केंद्रात सरकार काँग्रेसचं असतं, किंवा अन्य पक्षाचं असतं आणि भाजप विरोधी पक्षामध्ये असता आणि इतक्या मोठ्या इस्त्रायली अॅपद्वारे हे फोन टॅपचं प्रकरण समोर आलं असतं तर भाजपने संपूर्ण देशामध्ये तांडव केला असता. पण ते आज आम्हाला ज्ञान शिकवताहेत लोकशाहीला धोका आहे…आम्हाला माहिती आहे लोकशाहीला नाही संपूर्ण देशाला धोका आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

या प्रकरणी सरकारचा बचाव करताना माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कोविडची हाताळणी ज्या पद्धतीने केली आणि ७५ टक्के नागरिकांना मोफत लसी पुरवतोय यामुळे आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत त्या अशा पद्धतीचं षडयंत्र रचतायत असं म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी खरमरीत टीका केली. “आंतरराष्ट्रीय ताकद कोणाची…इस्त्रायलची…इस्त्रायल तर भारताचा दोस्त आहे. मोदींच्या काळामध्ये नेत्यानाहू आणि मोदी यांचे एकमेकांना मिठ्या मारतानाचे सगळ्यात जास्त फोटो प्रसिद्ध झाले आहेत आणि इस्त्रायलमध्ये नेत्यानाहूंच्या प्रचाराला मोदींचे पोस्टर लागेल होते तिकडे….त्यामुळे त्यांनी आम्हाला हे सांगू नये,” असा घणाघात राऊतांनी केला.

“या देशातल्या पत्रकारांसह हजारो प्रमुख लोकांचे फोन रेकॉर्ड झालेले आहेत, चोरुन ऐकलेले आहेत. या चोऱ्यामाऱ्या करणं बंद करणं गरजेचं आहे. हा विश्वासघात आहे देशाशी लक्षात घ्या. हा लोकशाहीला धोका आहे पण हा देशाशी आणि सव्वाशे कोटी जनतेशी विश्वासघात आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

पेगाससचा वापर महाराष्ट्रामध्ये १०० टक्के झालाय

“आज आमची नावं दिसत नाहीत पण आमची नावं असणार त्यात…आम्हाला खात्री आहे. हळूहळू जेव्हा नावं समोर येतील त्यांत महाराष्ट्रातील अनेक नावं असण्याची शक्यता आहे. पेगाससचा वापर महाराष्ट्रामध्ये १०० टक्के झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला रोखण्यासाठी अशा प्रकारची तंत्रज्ञान आणि यंत्रणा वापरली गेली आणि आजही वापरली जात असावी. हे फार मोठं षडयंत्र आहे आणि सरकारी मदतीशिवाय अशा प्रकारचं धाडस आणि हिंमत कोणी करु शकत नाही,” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर रोख ठेवला आहे.

तरीसुद्धा महाराष्ट्रात आमचं सरकार आणलं

“महाराष्ट्र विकास आघाडी जेव्हा स्थापन होत होती तेव्हा आमच्या सारख्या प्रमुख नेत्यांचे फोन टॅप होत हेते. नाना पटोले यांनी विधानसभेत तो प्रश्न मांडला, त्याआधी मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली आहे. तेव्हाच्या सरकारच्या मदतीशिवाय अशा पद्धतीचे फोन टॅप होऊ शकत नाहीत,” असा संशय राऊतांनी व्यक्त केला.

“पश्चिम बंगालमधल्या अनेक लोकांचे फोन टॅप झाले, ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी त्यांचा फोन टॅप झाला. तरिही बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला. आमचे फोन टॅप करुन सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आणू शकलो. तुम्ही कितीही आणची घएराबंदी करण्याचे प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही आणि मी घाबरत नाही,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

देशात कोणही सुरक्षित नाही

“पेगासस प्रकरणाचा जो काही भांडोफोड झाला यावरुन स्पष्ट दिसतं या देशामध्ये कोणीही सुरक्षित राहिलेलं नाही. नागरिकांना वाटतं आमच्यावर पाळत ठेवली जात आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी असतील, मंत्री, पत्रकार, राजकीय कार्यकर्ते असतील पाळत हेरगिरीची नजर आहे हे स्पष्ट झालं आहे. राहुल गांधी ते अनेक प्रमुख पत्रकारांपर्यंत निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त अशोक लवासा त्यांच्यावर कशाकरिता पाळत ठेवली? तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी २०१९ साली आचारसंहितेचा भंग केल्याचा मत व्यक्त केलं होतं, एकमेव निवडणूक आयुक्त होते. माजी मुख्य न्यायधिशांवर जो एक आरोप झाले आहेत. त्या महिला ज्या फिर्यादी आहेत, त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. सगळ्यात धक्कादायक, केंद्रामध्ये जे दोन केंद्रीय मंत्री आहेत ज्यामध्ये प्रल्हाद पटेल आणि आश्विनी वैष्णव त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली ती का आणि कशासाठी कळत नाही. ज्यांच्यावर पाळत ठेवली त्यांना मंत्री करण्यात आलं, त्यांच्यावर आधी पाळत का ठेवली? याचा खुलासा सरकारने करावा,” असं संजय राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -