Corona Vaccination: १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस घेता येणार

Centre's big decision oxygen shortage, mandatory of oxygen plant per bed in the hospital says union minister prakash javadekar
ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, रुग्णालयात प्रत्येक बेडनुसार ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची सक्ती

देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू झाली. यादरम्यान आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. त्यानंतर १ मार्चला या लसीकरण मोहीमेचा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जातेय. पण आता लसीकरणाबाबत केंद्रीय कॅबिनेटमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सरसकट ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेता येणार आहे. त्यामुळे आता सर्व पात्र असलेल्या नागरिकांनी त्वरित नोंदणी करून लसीकरण करावे, अशी आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. गेल्या २४ तासांत ३२ लाखांहून अधिक नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे. सध्या देशात कोरोना लसीकरण वेगाने होत आहे. आतापर्यंत ४ कोटी ८५ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ४ कोटींहून अधिक जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असून ८५ लाखांहून अधिक जणांनी दुसरा डोस घेतला आहे. याबाबतची सविस्तर माहिती प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फेब्रुवारी महिन्यात दरदिवसाला ३ लाख ७७ हजार कोरोनाची लस दिली जात होती. त्यानंतर मार्चमध्ये दैनंदिन कोरोना लसीकरणाचा आकडा १५ लाख ५४ हजारांपर्यंत पोहोचला. दरम्यान मागील २४ तासांत देशात ४० हजार ७१५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २९ हजार ७८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार

देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकताच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली होती. आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः ४५ वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी व्हिसी मध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.

सुरवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होते. आतापर्यंत (दि. २२ मार्चच्या आकडेवारीनुसार) राज्यात ४५ लाख ९१ हजार ४०१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.


हेही वाचा – Corona Cases In India Update: दिलासादायक! १२ दिवसांनंतर देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट!