चांगले रस्ते हवे असतील, तर पैसे द्यावेच लागतील

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती

Nitin Gadkari

दिल्ली ते मुंबई फक्त १२ तासांत प्रवास होणार आहे. हे स्वप्न नव्हे तर प्रत्यक्षात येणार आहे. याचे श्रेय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या टीमला जात आहे. दिल्ली-मुंबई हा जगातील सर्वात मोठा एक्स्प्रेस हायवे आहे. तोही १२ लेनचा बांधण्यात येत आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. हा एक्स्प्रेस हायवे हरयाणा, राजस्थान आणि गुजरातसह अनेक राज्यांतून जाईल. याचे काम वेगाने सुरू आहे. या राज्यांमधील नागरिकांच्या विकासात आणि समृद्धीत रस्त्याने भर पडेल, असे नितीन गडकरी म्हणाले. चांगली सेवा हवी असेल, चांगले रस्ते हवे असतील तर लोकांना पैसे द्यावेच लागतील, असेही त्यांनी सांगितले.

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस हायवे हा ८० हजार ते १ लाख कोटी रुपयांच्या खर्चाचा आहे. हा हायवे २ वर्षांत पूर्ण होणार आहे. १ लाख कोटींच्या कामासाठी जर तीन ते साडेतीन वर्षे लागतील आणि २०० कोटींच्या कामासाठी १० वर्षे लागतील तर ही कौतुकाची बाब नाही. अशा कामांमुळे लाज वाटते, असेही नितीन गडकरी म्हणाले.

अमेरिकेचे रस्ते चांगले नाहीत, कारण अमेरिका श्रीमंत आहे. पण अमेरिका श्रीमंत आहे, कारण तिथले रस्ते सर्वात चांगले आहेत, हे मी माझ्या ऑफिसमध्ये लिहून ठेवले आहे. हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनडी यांनी म्हटले होते. रस्त्यांमुळे विकास होतो आणि समृद्धी येते. रस्ते बांधल्यानतंर जमिनीच्या किमती वाढतात. आम्ही शेतकर्‍यांना बाजारभावापेक्षाही अधिक दीडपट किंमत दिली आहे. मी स्वतः शेतकरी आहे. आम्ही शेतकर्‍यांबाबत उदार धोरण राबत जमिनीची मोठी किंमत दिली आहे. यामुळे शेतकर्‍यांनी आपली जमीन विकू नये, हे माझे त्यांना आवाहन आहे. ती जमीन विकसित करण्यासाठी पुढे आल्यास तुम्हाला अधिक पैसे मिळतील. शेतकरी श्रीमंत व्हावा, अशी माझी इच्छा आहे. पण आम्ही रस्ते बांधतो तेव्हा बिल्डर आणि डेव्हलपर आधीच जमीन विकत घेऊन ठेवतात. नंतर जमिनीची जी किंमत वाढते, त्याचा फायदा ते घेतात, असे नितीन गडकरी म्हणाले.

सासर्‍यांच्या घरावर बुलडोझर चालवला…

गडकरी यांनी यावेळी एक किस्साही सांगितला. माझे नुकतचे लग्न झाले होते. तेव्हा रामटेकमधील आपल्या सासर्‍यांचे घर रस्त्याच्या मधोमध येत होते. ही मोठी समस्या होती. नागरिकांना वाहतुकीत मोठे अडथळे येत होते. यावेळी पत्नीला न कळवताच आपण सासर्‍यांच्या घरावर बुलडोझर चालवला होता. हेच नेत्यांनी करायला हवे. अतिक्रमण वाचवण्याचे पाप नेत्यांनी करू नये, असे नितीन गडकरी म्हणाले.